Breaking News

नवीन मतदार नावनोंदणीसाठी 6035 अर्ज


अहमदनगर /प्रतिनिधी : मतदार नावनोंदणीच्या विशेष मोहिमेंतर्गत नवीन मतदार नाव नोंदणीसाठी एकूण 6 हजार 035 फॉर्म प्राप्त झालेले आहेत. तसेच मतदार यादीतील नाव वगळणीसाठी  1 हजार 233, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी 1 हजार 749, मतदार संघामध्ये स्थानांतरासाठी 126 फॉर्म प्राप्त झालेले आहेत. अशाप्रकारे विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेस जिल्ह्यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने दिनांक 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून अद्याप नावनोंदणी करता आलेली नाही अशा पात्र वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 या दोन दिवशी जिल्ह्यातील सर्व 3 हजार 722 मतदान केंद्रावर विशेष मतदार नावनोंदणी मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

ज्या पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नसेल किंवा ज्या मतदारांना मतदारयादीतील तपशीलात दुरुस्ती करावयाची असेल त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.