Breaking News

जावलीतील आठ गावातील विकासकामांसाठी 70 लाख मंजूर


सातारा,  (प्रतिनिधी) : आमदार फंडासह विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदासंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला आहे. जावली तालुक्यातील आठ गावांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी त्यांनी कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीमधून 70 लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे.

कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांसाठी निधी वाटपास मंजूरी देण्यात आली आहे. त्याअनुशंगाने समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुचित केलेल्या जावली तालुक्यातील आठ गावामधील विविध विकासकामांना 70 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. जावली तालुक्यातील उंबरेवाडी येथे उंबरेवाडी ते पिसाडी हा रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपये, निपाणी येथे सुतारवस्ती अंतर्गत सभामंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपये, आंबेघर तर्फ मेढा येथील बेलाईदेवी रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये, रेंगडी येथील अंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी 10 लाख रुपये, गांजे येथील महादेव मंदीरालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी 5 लाख रुपये, पिंपरी अंतर्गत ते गांजे रस्ता मातीकाम व खडीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, तळेमाळ येथे सभामंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपये आणि सह्याद्रीनगर येथे सभामंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार या आठही कामांचे प्रस्ताव संबंधित विभागाने इस्टीमेट तयार करुन राज्य शासनाकडे पाठवले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा केल्यामुळे भुकंप पुनर्वसन निधी समितीमधून या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. निवीदा प्रक्रीया व इतर शासकीय सोपस्कार पुर्ण करुन तातडीने काम सुरु करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधीत अधिकार्‍यांना केल्या आहेत.