Breaking News

शीतलाट आणि हिमकणांचा स्ट्रॉबेरीला फटका; 70 एकरातील दीड कोटीच्या स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान


महाबळेश्‍वर (प्रतिनिधी) : परिसरात पडलेल्या हिमकणांनी सुमारे 70 एकर क्षेत्रातील दीड कोटी रुपयांच्या स्ट्रॉबेरी पिकांचे नुकसान झाले असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक हैराण झाले आहेत. तोडण्यासाठी तयार झालेली शेकडो किलो स्ट्रॉबेरीची फळे वाया गेली असून, हातातोंडाला आलेले बटाटा, वांगी, फरासी आदी पिकांनाही फटका बसला आहे. यावर्षी महाबळेश्‍वरमध्ये थंडीने चांगलाच कहर केला असून, गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पाच वेळा महाबळेश्‍वरमध्ये दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्याचा प्रकार घडला आहे. दि. 9 फेब्रुवारी रोजी तर तापमानाने कमालच केली. उणे दोन अंश सेल्सिअस तापमानामुळे महाबळेश्‍वरच्या वेण्णालेक परिसर ते लिंगमळा परिसर या भागात दवबिंदू पुन्हा गोठले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दवबिंदू गोठण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याचा परिणाम वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील सुमारे सव्वाशे एकर क्षेत्रावरील पिकांवर झाला असून, त्यामध्ये 70 एकर क्षेत्र एकट्या स्ट्रॉबेरीचे आहे. या 70 एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीची रोपे हिमकणांनी जळून गेल्यासारखी झाली आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न आता मिळणारच नाही. सरासरी दोन ते अडीच लाख रुपये एकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीपासून शेतकर्‍यांना मिळतात. 70 एकरावरील स्ट्रॉबेरी पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील सुमारे 15 एकर क्षेत्रांवरील बटाटा तर 10 एकर क्षेत्रावरील फरासी पिकालाही थंडीचा तडाखा बसला आहे. कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्यासारखी स्ट्रॉबेरी पिकाची अवस्था आहे.अक्षरशः हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली असून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे सावट आहे. हीच परिस्थिती पालेभाज्या व फुलशेती करणार्या शेतकर्यांची आहे. स्ट्रॉबेरीची फळे वरुन मोठी दिसत असली तरी आत मात्र ती पूर्णपणे नासल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी हे मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. थंडीमुळे संपूर्ण तोडा वाया गेला असून आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा काही महिने थांबावे लागणार आहे. मळ्यातील तूतूची (मलबेरी) झाडे, जांभूळ, पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत. वांगी, बटाटा, फराशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदींची रोपेही जळून गेली आहेत. त्यामुळे या मळेधारकांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झेंडू, गुलाब, जरबेरीया, कर्दळ, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांनी हिमकणांचे दागिने घातले होते व त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. त्याच फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी बनली आहे. नर्सरीचालकांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात थंडीमुळे दवबिंदूंचे हिमकण बनून पिकांचे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात होण्याची ही पहिलीच वेळ असून या नुकसानीमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानीत शेतीचे पंचनामे करून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांना सावरणे अवघड होणार आहे. त्यांनी घेतलेली सोसायटी, बँकांची कर्जे फिटणार नसल्याने त्यांना नुकसानभरपाईची गरज असल्याचे स्ट्रॉबेरीउत्पादक शेतकरी सी. डी. बावळेकर यांनी लोकमंथनशी बोलताना सांगितले.