86 किलो गांजासह दोघांना अटक; सातारा पोलिसांची महामार्गावर कारवाई: कार, दुचाकी जप्त


सातारा (प्रतिनिधी) : शहरालगत महामार्गावरून तब्बल 86 किलो वजनाचा अंमली पदार्थ असणार्‍या गांजाची वाहतूक करणार्‍या दोघांना सातारा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कार, दुचाकी व गांजा असा एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शंकर विलास जाधव व लक्ष्मण अंकुश जाधव (दोघे रा. पळशी ता. खटाव) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा महामार्गावरुन अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा उपविभागीय पोलिसांना मिळाली. गुरुवारी त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी कराड दिशेने साताराकडे येणारी सॅन्ट्रो कार (क्र. एमएच 11 वाय 3796) व दुचाकी (क्र. एमएच 11 एएस 1541) पोलिसांना निदर्शनास आली. ही दोन्ही वाहने एकामागोमाग होती. पोलिसांना या वाहनांचा संशय आल्याने त्यांनी ती वाहने थांबवली. पोलिसांना पाहताच दोन्ही वाहनचालक गडबडले व गाडी तशीच दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.पोलिसांनी कारमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये लहान लहान गठोडी होती. पोलिसांनी त्याबाबत संशयितांकडे चौकशी केली असता ते निरुत्तर झाले. वाहतुकीचा परवानाबाबतही विचारल्यानंतर तो नसल्याचा सांगितल्याने पोलिसांनी त्यांनी कारमधून खाली उतरले. संबंधित दोघांना नावे विचारली असता त्यांनी शंकर जाधव व लक्ष्मण जाधव अशी असल्याचे सांगितले.

सातारा पोलिसांनी महामार्गालगत मोठी कारवाई केल्याने परिसरात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांनी गाठोडे खोलून पाहिले असता त्यामध्ये गांजा सदृश्य पदार्थ होता. त्यामुळे शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी, वजनकाटा व पोलिसांची मोबाईल फॉरेन्सिक वाहन घटनास्थळी पाचारण करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तो गांजा सदृश्य पदार्थ असल्याचे समोर आले. त्याचे वजन केले असता तो सुमारे 86 किलो वजनाचा असल्याचेही स्पष्ट झाले. या सर्व मुद्देमालाची किंमत अंदाजे आठ लाख रुपये आहे. पंचनाम्याची प्रक्रिया झाल्यानंतर पोलिसांनी कार, दुचाकी व गांजा जप्त केला. रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बालम मुल्ला, ओव्हाळ, बनकर, भुरे, करपे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget