Breaking News

‘जैश’ च्या कमांडरला अल्पावधीत ठार केल्याचा अभिमान - मोदी


जयपूरः पुलवामा येथील हल्ल्यात चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर 100 तासांत ‘जैश’चा कमांडर कामरान याला सुरक्षा दलांनी ठार केले. जवानांच्या या कृतीचा मला सार्थ अभिमान आहे. या वेळी आम्ही शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर देणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

राजस्थानातील सवाई माधवपूरमधल्या रॅलीत ते बोलत होते. जे जवान शहीद झाले त्यांचा त्याग खूपच मोठा आहे. आपल्या सीमेवर वाघासारखे जवान आहेत, म्हणूनच आपण निधड्या छातीने जगाला सामोरे जात आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत. असे असले, तरीही मोदी यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या सभेच्या आधी त्यांनी पुलवामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. सवाई माधवपूर आणि इतर भागात असलेल्या 8 पैकी 7 जागा भाजपने गमावल्या. सवाई माधवपूर हा सचिन पायलट यांचा गड मानला जातो तिथूनच मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जसे यश भाजपला मिळाले, त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न या कृतीतून स्पष्टपणे दिसतो आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरशी झाल्याने त्यांचा प्रयत्न हा आहे, की राजस्थानात आपल्या लोकभेच्या जास्त जागा कशा जिंकता येतील; मात्र मोदी यांची लोकप्रियता हे काँग्रेससमोरचे मोठे आव्हान आहे. राजस्थानात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळतात असे मानले जाते; मात्र ही प्रथा मोडण्यासाठी मोदी आणि भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे.