Breaking News

राष्ट्रपुरुषांच्या विचारांची देशाला खरी गरज - केबलवाला


अहमदनगर/प्रतिनिधी : “प्रतिकार करणे हा माणसाचा स्वभाव आहे, देशात अहिंसा ठेवण्यासाठी महात्मा गांधींचे प्रयत्न होते तसे भारत देशाची फाळणी होऊ नये म्हणून मुस्लीम नेते प्रयत्नशील होते, तरीही फाळणीचे गुन्हेगार म्हणून मुस्लीम समाजाकडे पाहिले जाते, ही खंत आहे. माजी राष्ट्रपती जाकीर हुसेन व राजेंद्र प्रसाद यांनी मदरसातून शिक्षण घेतले होते, परंतु आज मदरसाला दहशतवादी संबोधले जाते, तसा अपप्रचार केला जातो, ही दुर्दैवी गोष्ट आहे’’, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कासमभाई केबलवाला यांनी केले.

शहरात सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने सरहद गांधी अब्दुल गफ्फार खान व माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन यांची जयंती रामचंद्र खुंट येथील ट्रस्टच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी कासमभाई बोलत होते. याप्रसंगी नईम सरदार, तन्वीर चष्मावाला, शफकत सय्यद, इम्रान जहागीरदार, आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, “भारताची फाळणी टाळण्यासाठी सरहद गांधी यांनी प्रयत्न केले, मदरशासारख्या शिक्षणामुळे डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ.जाकीर हुसेन हे राष्ट्रपती या माध्यमातून झाले, हे विसरुन चालणार नाही. या महान नेत्यांच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नईम सरदार म्हणाले, “सरहद गांधी अब्दुल गफ्फार खान यांनी खुदाई खिदमदगार सामाजिक संघटन काढले होते. या संघटनेच्या सफलतेने इंग्रजांना अस्वस्थ केले होते. त्याचप्रमाणे गफ्फारखान यांनी सीमेवर राहणार्‍या पठाणांना महात्मा गांधींच्या अहिंसेचा मार्ग दाखविला.’’
सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले तर प्रास्तविक सय्यद शफाकत यांनी केले. आभार जावेद खान यांनी मानले.