Breaking News

बाजार समिती कर्मचार्‍यांचे गुरुवारपासून आंदोलन


अहमदनगर /प्रतिनिधी :  “राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या सचिव ते शिपाई व हंगामी, रोजंदारी कर्मचार्‍यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे’ या मागणीसाठी कर्मचार्‍यांच्या राज्य संघटनेच्या वतीने गुरुवार (दि.28) पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आयोजित केलेले असून राज्यातील सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात यावे’’ असे निवेदन कर्मचार्‍यांनी बाजार समितीला दिले आहे.

याबाबत नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांना सचिव अभय भिसे, संजय नन्नवरे, सचिन सातपुते, बाळासाहेब लबडे, प्रकाश कळमकर, संदीप शिंदे, सुभाष जगताप, भरत कोतकर, दीपक भालेराव आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “बाजार समितीचे कायम सेवेतील व हंगामी, रोजंदारीवरील सर्व कर्मचारी मिळून महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे च्या माध्यमातून राज्यातील कर्मचार्‍यांना न्याय मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासनाने शासन निर्णय दि.14 जून 2017 नुसार अभ्यास समिती गठीत करुन अहवाल मागवलेला होता. अभ्यास समितीने दि. 20 नोव्हेंबर 2017 रोजी शासनास अहवाल सादर केला आहे. अहवालावर राज्यशासनाने दि.10 जानेवारी 2018 रोजी पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अभ्यास समितीने सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा झालेली आहे. बैठकीत ठरल्यानुसार पणन संचालक, पुणे यांचा अभिप्राय शासनाने मागविला होता. पणन संचालक यांनी त्यांचा अहवाल दि.01 सप्टेंबर 2018 अन्वये राज्य शासनास सादर केलेला आहे. परंतु शासनाने अद्याप बैठक आयोजित केली नसून अभ्यास समितीचा अहवाल स्वीकारुन न्यास दिला नाही.
राज्यातील बाजार समिती कर्मचार्‍यांना शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे शासनाच्या धोरणानुसार महागाई भत्ता वाढ मिळत नाही, पदोन्नती मिळत नाही, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन आदी लाभ मिळत नाहीत. तसेच महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधील कर्मचार्‍यांना पाच, दहा, पंधरा, चौवीस महिन्यापर्यंत पगार नाहीत. तसेच वेतन आयोग वेळेवर नाहीत.

वरील बाबींचा विचार करता, राज्यातील बाजार समिती कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडण्यासाठी राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे गुरुवार (दि. 28) पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. यामध्ये सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याने दि. 28 पासून पुढील निर्णय होईपर्यंत नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामावर कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत’’असे  निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी संचालक संदीप कर्डिले, बाबासाहेब खर्से, बन्शी कराळे, दिलीप भालसिंग, कानिफनाथ कासार, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, बहिरू कोतकर आदी उपस्थित होते. बाजार समिती कर्मचार्‍यांच्या या मागणीला भाजीपाला, फळे आडते असो., आडते बाजार मर्चंट असो., जागरी मर्चंट, मिरची मर्चंट असो. यांनी पाठींबा दिला आहे.