Breaking News

विद्यापीठ उपकेंद्रात मनसे विद्यार्थी सेनेची निदर्शने


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राकडून विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून ती थांबविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर येथील उपकेंद्राच्या संचालकांना निवेदन देण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.

पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र म्हणून अहमदनगरचे केंद्र हे विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी तसेच त्यांच्या अडी अडचणी कमी होण्यासाठी करण्यात आले होते. किरकोळ कामासाठी विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठात पुणे येथे जावे लागणार नाही. पण आता या गोष्टींचा विसरच उपकेंद्राला पडला आहे की काय? असा प्रश्‍न आहे. कारण आता पुन्हा विद्यार्थ्यांना किरकोळ कामासाठी पुण्याला चकरा माराव्या लागत आहेत. विषयाचे फेरतपासणी असो वा डुप्लीकेट मार्कशीट असो किंवा इतर कागदपत्र असो पण यामध्ये विद्यार्थ्यांचीच हेळसांड होत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा विचार करुन उपकेंद्राला टाळे ठोकणार असून यावर लवकरात लवकर योग्य उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, शहराध्यक्ष परेश पुरोहित, अनिकेत शियाळ, प्रकाश गायकवाड, प्रमोद ठाकूर, महेश होनराव आदिंसह पदाधिकारी
उपस्थित होते.