Breaking News

स्वप्निल सुतार खूनप्रकरणी तपासासाठी पथके रवाना


कराड (प्रतिनिधी) - पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत मालखेड गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी स्वप्नील गणेश सुतार याचा खून झाल्याचे उघड झाले होते. खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी पुणे आणि पेठवडगाव येथे तपासासाठी दोन पथके पाठवली असून या मार्गावरील मिळेल ते सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान पोलिसांच्या हाती खून प्रकरणी महत्त्वाची माहिती मिळाली असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

मालखेड ता. कराड येथील अशोक जाधव यांच्या मालकीच्या शेतात एका तरूणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. जाधव यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताच्या खिशातील मोबाईल ताब्यात घेतला. स्विच ऑफ असलेला मोबाईल पोलिसांनी सुरू केल्यावर त्यावर मृताच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले. यावरून तो मृतदेह स्वप्नील गणेश सुतार रा. पेठवडगाव याचा असल्याचे निष्पन्न झाले. स्वप्नील पुण्यावरून रविवारी रात्री पेठवडगांवला जाण्यासाठी निघाला असताना रात्री 11.30 नंतर त्याचा मोबाईल बंद झाला.