शेतकरी उपाशी, साखर कारखानदार तुपाशी साखरेच्या दराबाबत शेतकर्‍यांची फसवणूक कधी थांबणार ?सातारा, (प्रतिनिधी) : देशात सध्या साखरेचे दर हे 34 ते 50 रूपये किलोच्या आसपास आहे. परंतु, कारखानदारांकडून शेतकर्‍यांच्या उसाला प्रतिटन एफआरपी मात्र 2500 रूपये दिली जात आहे. प्रत्येकवेळी कारखानदारांकडून साखरेच्या दराबाबत दिशाभूल केली जात असून ती यावर्षीही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी उपाशी तर कारखानदार तुपाशी अशी अवस्था दिसून येत आहे.

देशातील कारखानदारांच्या लॉबीकडून सरकारवर साखरेचा हमीभाव प्रति क्विंटल 3400 रूपये करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. साखरेला दर नसल्याने उसाला दर देता येत नसल्याचे कारण कारखानदारांकडून सांगितले जात आहे. ज्यावेळी साखरेचे दर पडतात अशा वेळी कारखानदार आकांडतांडव करत असतात. मात्र, बाजारपेठेत याच साखरेचे दर वाढल्यानंतर कारखानदार मूग गिळून गप्प असतात. मुळात शेतकर्‍याच्या उसाची एफआरपी साखरेच्या किमतीशी जोडल्याने शेतकरी भरडला जात आहे. कारखानदार फक्त आपला फायदा पाहून एफआरपीपोटी शेतकर्‍याच्या उसाला कमी रक्कम देत आहे. यंदा कोल्हापूरमध्ये एकरकमी एकरकमी एफआरपी व साखरेचे दर वाढल्यास 200 रूपये देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. परंतु, जिथे एफआरपीचा पत्ता नाही अशा अवस्थेत वाढीव साखरेच्या दराचे कोठे घेऊन बसलात. गतवर्षी साखरेचे अतिरिक्त झालेले उत्पादन व निर्यातीअभावी साखरेचा प्रचंड कोटा आहे. मात्र, गेल्या महिन्यात चीनला साखर निर्यात करण्याबाबत बोलणी करण्यात आली आहेत. त्यामुळे देशातील 20 लाख मेट्रीक टन साखर जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 20 ते 30 टक्के आहे. तर देशांतर्गत बाजारपेठेतही प्रतिकिलो 34 ते 50 रूपये दर आहे. त्यामुळे कारखानदारांना प्रतिक्विंटल 3400 ते 5000 हजार रूपये दर मिळत असताना मात्र शेतकर्‍याच्या हातात फक्त 2500 देण्यात आले आहे.
कारखानदारांची ही चलाखी सहसा शेतकर्‍यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे जेवढी एफआरपी मिळते त्यातच शेतकरी समाधान मानत आहे. यामुळे काही दिवस गोड वाटले तरी पुढचा हंगाम येईपर्यंत पैसे नसल्याने पुन्हा कर्ज काढावे लागत आहे. यावर विविध संघटनांनी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यानंतर किमान यावर्षी तरी एफआरपी+200 रूपये मिळतील. यासाठी शेतकर्‍यांनी रोजच्या दरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
गतवर्षी देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यातच निर्यातीला निर्बंध घातल्याने देशात लाखो मेट्रीक टन साखर पडून होती. त्यामुळे कारखानदारांचे नुकसान होऊ नये यासाठी कारखान्यांसाठी साखरेचा बफर स्टॉक जाहीर झाला होता. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 656 टन साखरेचा स्टॉक कारखान्यांनी केला आहे. गतवर्षी साखरेचा दर हा 2500 रूपये प्रतिक्विंटल झाला होता. त्यामुळे केंद्रानेच कारखान्यांची सोय केली होती. याप्रमाणेच संबधित कारखान्यांना गोदाम भाडे व विमा हफ्त्याला अनुदान जाहीर केले होते.
मात्र, आता साखरेचा दर 3400 च्या घरात आहे. त्यामुळे कारखानदारांना 800 रूपयांचा फायदा होणार आहे. मात्र, त्याचवेळी कारखान्यांनी उसाला सुमारे 2850 एफआरपी दिली होती. त्यामुळे जर बफर स्टॉकची साखर विक्रीस काढल्यानंतर जर साखर विक्री झाली तर उर्वरित प्रतिटन 550 रूपये शेतकर्‍यांना मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget