Breaking News

मतदार यादीतील नावाबद्दल शंका असल्यास तक्रार करावी : श्‍वेता सिंघल


सातारा (प्रतिनिधी): राजकीय पक्षांनी मतदान केंद्र सहायकांची तात्काळ नेमणूक करुन त्यांची यादी निवडणूक विभागाला सादर करावी. तसेच मतदार यादीतील नावाबद्दल शंका असल्यास तर तक्रार कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे, या अनुषंगाने विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्‍वेता सिंघल बोलत होत्या. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाचे ‘वंचित न राहो कोणी मतदार’ हे घोषवाक्य आहे. या घोषवाक्यानुसार मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी वाहनाची, अंध व्यक्तींसाठी मतपत्रिका ब्रेल लिपीत, व्हिलचेअर, रॅम्प यांच्यासह विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तीचे नाव मतदार यादीत नसल्यास त्यांनी निवडणूक मतदार प्रक्रियेतील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणू द्यावे, अशा सूचनाही श्‍वेता सिंघल यांनी शेवटी केल्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी पेड न्यूज आणि प्रचार साहित्याचे प्रमाणिकरणाबाबत माहिती सांगितली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूक विषयक कामकाजाची माहिती दिली.