Breaking News

आधी जनतेतून निवडून येवून दाखवा मग पवार साहेबांच्या पराभवाची भाषा करा


सातारा, (प्रतिनिधी) : संसदेच्या इतिहासामध्ये गेली 50 वर्षे माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी आम जनतेतून निवडून येऊन कारकीर्द गाजवली आहे. तुमच्यासारखे मागच्या दाराने येऊन मंत्री झालेले नाहीत. चंद्रकांत दादा तुमच्यातील सुप्तगुणांचा राष्ट्रवादी पक्ष आदर करतो परंतु पवार साहेब गेली 50 वर्षे जनतेतून निवडून येतात. तसे तुम्ही एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवा नंतर शरद पवार साहेबांच्या पराभवाची भाषा करा, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी लगावला.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती.शरद पवार माढा मतदार संघातून उभे राहिल्यास त्यांचा पराभव निश्‍चित आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खरपूस समाचार सुनील माने यांनी घेतला. चंद्रकांत दादा पाटील यांच्या टिकेला त्याच भाषेत सडेतोड उत्तर देताना माने म्हणाले, गेली 50 वर्षे विधानसभा आणि लोकसभेवर पवारसाहेब यांना बारामती मतदार संघातून जनतेने त्यांना विक्रमी मताने निवडून दिले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पवार साहेबांनी बारामती मतदार संघातून जेवढया निवडणुका लढविल्या त्या निवडणुकांमध्ये त्यांनी गावोगावी जाऊन त्यांना प्रचार करावा लागला नाही. जनतेच्या प्रेमापोटी प्रचार न करता ते विक्रमी मताने निवडून आले आहेत. मतदार संघाच्या पुर्नरचना झाल्यानंतर त्यांनी माढा या नवीन मतदार संघातून निवडूक लढविली त्यावेळी सुध्दा नवखा मतदार संघ असतानाही सातारा आणि सोलापूर जिल्हयातील जनतेने साहेबांना उच्चांकी मताने विजयी केले होते. याचा विसर चंद्रकांतदादा पाटील तुम्हाला पडला तर नाही ना ? खा. शरद पवार साहेबां बद्दल तुम्हालाच काय देशातील जनतेला आदर आहे. त्यांचे वय झाले असले तरी त्यांच्या कामाची पद्धत काश्मिर पासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व राजकीय नेत्यांना माहिती आहे. साहेब सकाळपासून ते रात्री 12 पर्यंत जनसंपर्काचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना माढा मतदार संघातील सहाशे गावांमध्ये फिरुन प्रचार करण्याची गरज नाही. पवारसाहेबांनी माढामधून निवडणूक लढवावी हे कार्यकर्त्यांचे मत आहे. पवार साहेबांनी निवडूक लढवणार हे आजही जाहीर केले नाही. असे असताना तुम्ही त्यांच्या पराभवाची भाषा बोलता. यावरुनच तुमच्या राजकारणातील परीपक्वतेची जाणीव लोकांना होत आहे. पवार साहेब गेली 50 वर्षे आमजनतेतून निवडून येत आहेत मात्र तुम्ही पाच जिल्हयाच्या मर्यादित पदधीवर मतदारामधून अवघ्या 2138 मतांनी निवडून आला आहात. येणार्‍या लोकसभा निवडूकीत माढा मतदार संघातून मधून तुम्हीच उमेदवारी दाखल करा आणि निवडून येऊन दाखवा. माढयातील जनताच तुमचा दारुन पराभव करेल, असा टोला सुनिल माने यांनी लगावला. एकंदर चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खरपूस समाचार घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध नेत्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत चंद्रकांतदादा यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.