Breaking News

देशाला ‘डान्स’ मधून तंदुरुस्त करण्याचा मेगाइव्हेंट! टेरेंस लुईस काढणार युवकांना आभासी दुनियेतून बाहेर; देशभर डान्स प्रशिक्षण


भागा वरखडे

अहमदनगरः समाज माध्यमांच्या आभासी दुनियेत रममाण झालेल्या युवकांना त्यातून बाहेर काढून नृत्याच्या माध्यमातून त्यांना शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त करण्याचा विडा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि ‘डान्स इंडिया डान्स’चा सूत्रधार टेरेंस लुईस यांनी उचलला आहे. पहिल्या टप्प्यात दहा शहरांचा दौरा ते करणार आहेत.

आजकालचे युवक समाजमाध्यमांच्या आहारी गेले आहेत. फेसबुक, यू ट्यूब, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्ट्राग्रामसारख्या समाजमाध्यमांवर युवक सातत्याने मग्न असतात. त्यामुळे ते घरातून बाहेर पडत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर झाला आहे. लुईस टेरेंस यांना युवा पिढी अशी बरबाद होण्याबद्दल खंत वाटते. लगानसारख्या चित्रपटाची कोरिओग्राफी, अनेक वाहिन्यांच्या नृत्यविषयक कार्यक्रमाचे परीक्षक असलेल्या टेरेंस यांनी आता ‘टेरेंस लुईस प्रोफेशनल ट्रेेनिंग इन्स्टिटयूट’ स्थापन केली आहे. या माध्यमातून ते युवकांना नृत्याचे धडे देत असतात. यापूर्वी एकाच दिवसांत साडेचार हजार युवकांना एकाचवेळी नृत्य करायला लावून त्यांनी जागतिक विक्रमही केला आहे. आता त्यांना सामाजिक भावनेतून सर्वांना नृत्य करायला लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. नृत्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच युवक व अन्य व्यक्तींना घराबाहेर पडायला लावायचे ठऱविले आहे. समाजमाध्यमांच्या आभासी दुनियेतून काही काळ बाहेर पडून त्यांना माणसांच्या दुनियेत आणायचा संकल्प टेरेंस यांनी केला आहे.

अनेकांना नृत्य येत असते. काहींना त्याची आवड असते; परंतु काहींना नृत्याची भीती वाटते. काहींना आपल्याला ते जमेल की नाही, असे वाटते. अशा सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना नृत्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना नाचायला लावण्याचे टेरेंस यांनी ठरविले आहे. त्यांच्या ‘टेरेंस लुईस प्रोफेशनल ट्रेेनिंग इन्स्टिटयूट’संस्थेतील सहकार्‍यांना बरोबर घेऊन ते देशभर ‘डान्स इंडिया डान्स’ ही मोहीम राबविणार आहेत. त्यासाठी त्यांनी देशभरातील वेेगवेगळ्या नामंवत व्यायामशाळांबरोबर करारही केले आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे, औरंगाबाद, नागपूर, लुधियाना, चंडीगड, दिल्ली अशा शहरांचा तर दुसर्‍या टप्प्यात मुंबईसह अन्य शहरांत टेरेंस प्रशिक्षण घेणार आहेत. नाममात्र नोंदणीशुल्कात प्रमाणपत्र, नामांकित व्यायामशाळांत प्रशिक्षण, नृत्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नृत्याबद्दलची भीती दूर करण्यावर आणि नृत्यातून शारीरिक व मानसिक व्यायाम देण्यावर त्यांचा भर आहे. देश सशक्त करण्याच्या त्यांच्या या मोहिमेेचे अनेक ठिकाणांहून कौतुक झाले आहे.


मोबाईल वाट नाही; पण..

मोबाईल, स्मार्टफोन वाईट नाही; परंतु त्याचा विवेकाने वापर करायला हवा. त्याच्या आहारी जाऊन बिघडू नका. आरोग्याचे नुकसान करून घेऊ नका. नृत्यातून सशक्त बना, असे टेरेन्स यांनी ‘दैनिक लोकमंथन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.