Breaking News

‘नोकरभरतीने संचालकांचा सभासदांच्या पैशांवर डल्ला’


अहमदनगर/प्रतिनिधी : “सत्ताधारी संचालक मंडळ स्वतःच्या आर्थिक हितासाठी संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे अतिरिक्त कर्मचारी भरती करून संस्था व सभासदांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे’’, असा आरोप आप्पासाहेब शिंदे यांनी केला.

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ताधारी संचालक मंडळाने सुरु केलेली नोकर भरती तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी विरोधी संचालकांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, अंबादास राजळे, बाबासाहेब बोडखे सहभागी झाले होते.

अंबादास राजळे म्हणाले, “ संस्थेमध्ये भ्रष्ट व मनमानी कारभाराने नोकरभरती चालू आहे, ऑनलाईनसाठी लाखो रुपये खर्च करून सोसायटीचे कामकाज संगणकीकृत करण्यात आले तसेच बांधकामावर वारेमाप खर्च झालेला आहे. संस्थेची एकूण सभासद संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कमी होत असतानाही जास्तीच्या कर्मचार्‍यांची गरज दाखविण्यात आली आहे, सादर केलेल्या चुकीच्या सेवक आकृतीबंधासाठी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, सत्ताधारी संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे शिपाई पदासाठी घाईघाईने मुलाखती सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

बाबासाहेब बोडखे यांनी तीन वर्षापूर्वी सत्ताधारी संचालकांनी सर्वसाधारण सभेमध्ये जाहीरपणे संस्थेचे सर्व ऑनलाइन संगणकीकरणाचे काम झाल्यानंतर जास्त कर्मचारी लागणार नसल्याचे सांगितले होते. तरी सुध्दा आर्थिक हितापोटी ही कर्मचारी भरती सत्ताधारी संचालक करीत आहे. पुढील काळात कायमस्वरूपी या सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी व इतर खर्च हा सामान्य सभासदांच्याच माथी पडणार असल्याचे सांगितले. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी संचालक मंडळ सर्वसामान्य सभासदांचेच नुकसान करत आहे. विरोधी संचालक मंडळाने चालू ठेवलेला अनागोंदी कारभार बंद न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विरोधी संचालकांनी दिला आहे.