Breaking News

बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस-राहूल वाघमारे

बीड, (प्रतिनिधी)ः- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक, रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारीच्यापूर्वी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा ग्रंथालयाचे प्रदेश निमंत्रक राहूल वाघमारे यांनी केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रास हीत अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल केल्यानंतर पात्र उमेदवारांची रविवार (दि.१७) फेब्रुवारी रोजी चाळणी परीक्षा घेवून उमेदवारांची गुणानुक्रमे कोचिंगसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार (दि.२२) फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा परिक्षा क्लासेस सुरू होणार आहेत. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा ३ हजार रूपये विद्यावेतन तसेच निःशुल्क वाचन साहित्यासाठी ३ हजार किमतीच्या पुस्तकांच संच व ऑनलाईन स्टडी साहित्य संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी,पुणे मार्फत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण घेतले असेल अशा विद्यार्थ्यांची जरी गुणानुक्रमे निवड झालेली असली तरी त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व पुस्तकांचा संच दिला जाणार नाही. या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा तसेच अनुसूचित जातीचा असला पाहिजे. अर्जदाराचे वय किमान १८ ते ३५ वर्ष असले पाहिजे. त्याचबरोबर अर्जदार किमान इयत्ता १२ वी उतीर्ण असला पाहिजे. तरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी या मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा ग्रंथालयाचे प्रदेश निमंत्रक राहूल वाघमारे यांनी केले आहे.