Breaking News

करपेवाडीच्या मुलीच्या खूनप्रकरणी वडिलास आठ दिवस पोलिस कोठडी


ढेबेवाडी(प्रतिनिधी) : करपेवाडी (ता. पाटण) भाग्यश्री संतोष माने (वय 18) हीच्या खूनप्रकरणातील आरोपी सापडावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी नाभिक समाजाने आंदोलन, बंद पुकारले होते, त्या खूनातील संशयित म्हणून पोलिसांनी तिच्या वडिलांनाच ताब्यात घेतले असून त्याला आठ दिवस पोलिस कोठडी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाग्यश्रीचा गळा चिरून खून हा अंधश्रध्देच्या प्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात आहे.
करपेवाडी येथील भाग्यश्रीचा 22 जानेवारीला गळा चिरून खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली होती. त्यादिवशी सकाळी ती तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेण्यास सुरूवात केला होता. तेव्हा करपेवाडी ते तळमावले येथील जवळचा शॉटकट असलेल्या पाणंद रस्त्याला शेतात तिचा गळा चिरून खून केल्याच्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर तिचा मृतदेह कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणला असता तेथे नाभिक संघनांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांच्या आश्‍वासनानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अत्यसंस्कार करण्यात आले. मात्र लवकरात लवकर आरोपी सापडावेत म्हणून राज्यभर नाभिक संघटनानी आंदोलने, बंद पुकारण्यात आले होते.

कोणताच पुरवा न ठेवता हे कृत्य झाल्याने पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते. त्यामध्ये ढेबेवाडी पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे विभागाने तपास सर्व बाजूंनी सुरू ठेवला आहे. प्रत्येक संशयिताकडे गुप्तपणे पोलिस चौकशी करत आहेत. त्यामध्ये आता भाग्यश्रीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यामध्ये अंधश्रध्देचा मुद्द्यावर चौकशीला असल्याची परिसरात दिवसभर चर्चा होती. त्यामुळे नक्की हे प्रकरण कोणत्या दिशेला वळणार याविषयी नाभिक समाज तसेच राज्यभर चर्चा सुरू राहणार. शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतलेल्या संतोष माने यास शनिवारी दुपारी कोर्टात हजर केले असता, त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, भाग्यश्रीचा खून हा अंधश्रध्देतून झाला की नाही याबाबत सध्यातरी काहीही माहीती नसल्याचे पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.