Breaking News

वणव्यात जनावरांच्या शेडसह दुचाकी जळाली; भोसगाव येथील घटनेत दीड लाखांचे नुकसान


ढेबेवाडी ( प्रतिनिधी) : आंब्रुळकरवाडी -भोसगाव(ता. पाटण) येथे वन हद्दीत लागलेला वणवा अचानक गावाच्या दिशेने सरकल्याने जनावरांच्या शेडसह गवताच्या गंजी आणि शेडमधील एक दुचाकी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, भोसगाव वन हद्दीलगत आंब्रुळकरवाडी येथे सत्तरच्या वर कुटुंब वास्तव्यास आहेत. गावालगत दिनकर विठ्ठल आंब्रुळकर आणि रंगराव विठ्ठल आंब्रुळकर यांची घरे होती. घराला लागूनच जनावरांचे शेड आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वन हद्दीत लागलेली आग हवा आणि गवतामुळे गावाच्या दिशेने पसरली. काही वेळातच रंगराव विठ्ठल आंब्रुळकर यांची गवताची गंज व जनावरांच्या शेडला आगीने वेढा दिला. भरदिवसा लागलेल्या या आगीची तीव्रता एवढी भयंकर होती की काही क्षणातच संपूर्ण शेड जळून खाक झाले. त्याचबरोबर शेडमधील जनावरांचे गवत सुध्दा जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामस्थ आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र टंचाईमुळे पाणी उपलब्ध झाले नाही.

जि. प.सदस्य रमेश पाटील यांनी तातडीने त्यांचा पाण्याचा टँकर पाठवून दिल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. त्यामुळे पुढील नुकसान टळले. पं.स.सदस्य प्रतापराव देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीतग्रस्तांना मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.