Breaking News

चालकाविना धावणार्‍या कारचा सातार्‍यातील राजपथावर थरार


सातारा, (प्रतिनिधी) : सातार्‍यातील नगरपालिका ते पोलिस करमणूक केंद्र या मार्गावर शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विनाचालक धावलेल्या कारचा थरार निर्माण झाला. या थरारक घटनेत दुचाकी चिरडली तर पोलिस करमणूक केंद्राची भिंत पडली.

गाडीचा हँडब्रेक सुटल्याने थेट गाडी भिंतीवर जावून आदळली. दरम्यानच्या मार्गावरील दुचाकीस्वार, पादचारी यांना मात्र चांगलीच धडकी भरली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गाडी (क्रं एम.एच.03 सीपी 5539) मालक हा गाडीचा हँडब्रेक लावून कामानिमित्त निघून गेला होता. मात्र, अचानक गाडीचा हँड ब्रेक निघाला. अन् त्याननंतर गाडी चालकाशिवाय धावू लागली. ऐन वर्दळीच्या वेळेतच ही कार रस्त्यावरून धावू लागल्याने नागरिकासह वाहनचालकांची पुरती दैना उडाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकीसह चारचाकी वाहने पार्क केली होती. मात्र ही कार पोलिस करमणूक केंद्राच्या दिशेने धावू लागली. या ठिकाणी उभ्या असलेल्या एका कारला हुलकावणी देत दुचाकीला धडक मारून ही कार पोलिस करमणूक केंद्रांच्या भिंतीवर जावून आदळली. त्यानंतर जोरदार आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक आवाजाच्या दिशेने धावले. त्यानंतर पोलिस करमणूक केंद्रासमोर वाहनचालकांसह नागरिकांची गर्दी झाली. मात्र, कारच्या समोर अन्य वाहने आली नसल्याने मोठा अनर्थ टळला.