Breaking News

भारत संचार निगमचे राहाता उपमंडल कार्यालय तीन दिवसांपासून जनरेटरवर


राहाता/प्रतिनीधी
विजबिल थकविल्याने भारत संचार निगमच्या राहाता उपमंडल कार्यालयाचा विद्युत पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. ग्राहकांची बोंबाबोंब व सेवेतील विस्कळीत पणा टाळण्यासाठी दररोज हजारो रूपयांचे डीझेल टाकून जनरेटरवर यंत्रसामग्री चालवण्याची नामुष्की भारत संचार निगम वर ओढवली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, भारत संचार निगमच्या राहाता उपमंडल कार्यालयाने 1 लाख 35 हजाराच्या दरम्यान वीज बिल थकविल्याने विजय वितरण कंपनीने या कार्यालयाचा विज पुरवठा खंडित केला आहे. विज बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने वारंवार पाठपुरावा व सूचना करूनही भारत संचार निगमच्या उपमंडल कार्यालयाने वीज बिल अदा न केल्याने अखेर गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रीछवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप जैन व पथकाने राहाता उपमंडल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
हा विज पुरवठा खंडित केल्याने राहाता उपमंडल कार्यालया अंतर्गत येणार्‍या काकडी विमानतळ कोर्‍हाळे, डोर्‍हाळे, अस्तगाव, गणेशनगर आदी उपकेंद्रांची लाईन जोडणी तसेच अनेक बीएसएनएल मोबाईल टावरची या उपमंडल कार्यालयाशी कनेक्टिविटी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शासकीय कार्यालये, बॅका तसेच लँडलाईन व इंटरनेट सेवा विस्कळित होण्याची मोठी शक्यता आहे. या परिस्थितीत इंटरनेटसाठी असलेल्या लीज लाइनला प्रॉब्लेम येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
20 डिसेंबर 2018 नंतर भारत संचार निगमच्या राहाता उपमंडल कार्यालयाने वीज बिल भरले नव्हते. त्यामुळे जवळपास एक लाख तीस हजाराच्या दरम्यान थकित वीज बिल या कार्यालयाकडे होते.