अखिलेश यांना विमानतळावरच रोखले; समाजवादी पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांचा विमानतळाबाहेर गोंधळ


लखनऊः अलाहाबाद विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या शपथविधी समारंभासाठी जाणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुरक्षेचे कारण देऊन लखनऊ विमानतळावरच रोखण्यात आले. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या भडकलेल्या कार्यकर्त्यांनी लखनऊ विमानतळाबाहेर गोंधळ घातला. प्रयागराज विमानतळासमोर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योगी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

समाजवादी विचार तरुणांमध्ये रुजू नये, म्हणून सरकारने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे. अलाहबाद विद्यापीठात नुकत्याच छात्रसंघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाच्या युवा मोर्चाचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार पराभूत झाले. विजयी उमेदवारांच्या शपथविधी समारंभासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिलेश हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगीही घेतली होती; पण जेव्हा ते लखनऊ विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांना विमानात चढूच दिले नाही. प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू असल्यामुळे सुरक्षेची कारणे देत त्यांना लखनऊतच रोखण्यात आले. दरम्यान, यासंदर्भातील लेखी आदेशाबाबत विचारणा केली असता पोलिसांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याची माहिती अखिलेश यांनी दिली आहे. यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

अखिलेश यांना रोखल्यामुळे लखनऊ विमानतळाबाहेर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. प्रयागराज विमानतळाबाहेरही घोषणाबाजी करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यामुळे हे पाऊल उचलले असल्याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.


अखिलेश जिथे, गोंधळ तिथेः योगींची टीका 
अखिलेश यादव जिथे जातात, तिथे गदारोळ होत असल्याचा इतिहास आहे. प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे, तेव्हा अशावेळी हिंसा टाळण्यासाठी आणि शांततामय वातावरण टिकवण्यासाठी यादव यांना रोखण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. दहा दिवसांपूर्वीही अखिलेश यादव प्रयागराजला गेले होते तेव्हा कसे त्यांना रोखण्यात आले नाही, असा सवालही विचारला जातो आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget