Breaking News

आसाममध्ये मोदी यांना दाखवले काळे झेंडे


गुवाहाटी : आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसर्‍या दिवशी दोन ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. नागरिकत्व विधेयक मुद्यावरून मोदी यांच्या रॅलीचा काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला.

लोकसभेत आठ जानेवारीला ‘नागरिकत्व विधेयक’ मंजूर करण्यात आले; मात्र या विधेयकाला ईशान्य भारतातील राज्यांनी विरोध दर्शवला आहे. बांगला देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधल्या मुस्लिम व्यक्ती सोडून इतर नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील हे विधेयक आहे. शनिवारी सकाळी क्रिषक मुक्ती संग्राम समितीच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमध्ये मोदी यांना काळे झेंडे दाखविले. अरुणाचल प्रदेशमधील विविध उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यासाठी मोदी राजभवन येथून विमानतळाकडे जात असताना हे काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मॅकहोवा परिसरात काळे झेंडे दाखवले. त्या वेळी ’सीटझनशीप बील रद्द करा,’ ‘मोदी गो बॅक’ अशा घोषणा देण्यात आल्या.

त्रिपुरामधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तीन खासदारांनी मोदी यांच्या रॅलीवर बहिष्कार टाकला आहे. यापूर्वी त्यांनी ‘सीटझनशीप बील’ला विरोध करणार्‍या आंदोलकांना पाठिंबा दिला होता.