Breaking News

दलित असल्याने नाकारले मुख्यमंत्रिपद


बंगळूरः कर्नाटकमध्ये काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा दिला. काँग्रेसपेक्षा निम्म्या जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्यात आले; परंतु त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद थांबायला तयार नाही. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्‍वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अडचणीत आली आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष ताकही फुंकून पीत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर पक्षातल्याच एका दिग्गज दलित नेत्याने केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसची डोकेदुःखी वाढली आहे. दावणगिरीत एका कार्यक्रमात बोलताना परमेश्‍वर यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, की तीन वेळा मला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती;

मात्र केवळ दलित असल्यामुळे मला ती संधी देण्यात आली नाही. काँग्रेस पक्षात काही लोक दलितांना वर जावू देत नाहीत. परमेश्‍वर यांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी हात झटकले आहेत. असे केव्हा झाले असेल, तर मला माहीत नाही. त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बसवलिंगप्पा, के. एच. रंगनाथ, मल्लिकार्जुन खर्गे यांनाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. काही लोक माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही परमेश्‍वर यांनी केला आहे. फक्त राजकीय स्तरावरच नाही, तर नोकर्‍यांमध्येही पदोन्नतीसाठी दलितांवर अन्याय होतो. आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र पण त्याचा फारसा फरक पडलेला नाही. नोकरीत भेदभाव झाल्यामुळे काही अधिकार्‍यांनी आत्महत्याही केल्या आहेत, असे ते म्हणाले.

परमेश्‍वर हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. कुमारस्वामी हे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील, की नाही याची काहीही शाश्‍वती नाही असे मत त्यांनी या आधी व्यक्त केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि धर्म निरपेक्ष जनता दलांत वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल-काँग्रेस आघाडीचे सरकार कोणत्याही परिस्थितीत अस्थिर होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगूनही काँग्रेसचे नेतेच सरकार अस्थिर होईल, असे वक्तव्य करीत आहेत. भाजपने काँग्रसच्या नाराज आमदारांना गळाला लावले असताना आता अशीच नाराजी व्यक्त होत राहिली, तर ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.