Breaking News

शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे तयार व्हावेत : शेख सुभान अली


बुलडाणा,(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज हे चिकित्सक वृत्ती आणि धर्मनिरपेक्ष आदर्श राजे होते. त्यांनी कधीही इतर जाती धर्मातील लोकांचा द्वेष केला नाही. उलट शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, महिलांचा आदर सन्मान केला म्हणून आज त्यांच्या विचारांचे मावळे तयार व्हावेत, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत शेख सुभान अली यांनी डोंगर शेवली येथे 10 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त गजानन घिरके होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, सरपंच स्वाती इंगळे, शे.युसूफ शे.गणी, शे.बिस्मिल्ला शे.अब्दुल, पटेल जमादार, डॉ.बबन परमेश्‍वर, प्रा.लक्ष्मण शिराळे, शरद खरात, ग्रामपंचायत सचिव पडघान, देव्हरीचे श्रीधर अंभोरे, वरखेडचे ग्रामसेवक योगेश पाचपवार यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना शेख सुभान अली म्हणाले की, स्त्री शिकली की बिघडते म्हणून महिलांच्या शिक्षणाला विरोध करणारे, प्लेगचा उंदिर परवडला पण अस्पृश्य नाही असे विकृत वर्णन करणारे बाळ गंगाधर टिळक लोकमान्य कसे? असा खडा सवालही अली यांनी उपस्थित केला. जे कधीच लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, जे आमचे महापुरुष रात्रंदिवस समस्त जनतेच्या हितासाठी, महिलांच्या उद्धारासाठी, शेतकर्‍यांच्या पोटाला अन्न मिळावं, शोषित पीडित कष्टकरी यांच्या कष्टाला बळ मिळवं म्हणून रात्रंदिवस झिजत राहिले. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीमाई, रमाई माता लोकमान्य नाहीत का? असाही प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर प्रखर टीका करताना ते म्हणाले की, लेखणी आमच्या हातात नव्हत्या, ज्यांच्या हातात लेखणी होत्या त्यांनी आमच्या महापुरुषांचा संपूर्ण इतिहास विकृत करुन टाकला. म्हणून आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागेल. इथे जितके लोक नैसर्गिक आपत्तीने मेले नाहीत त्यापेक्षा कितीतरी पट लोक हिंदू-मुस्लिमांच्या दंगली घडवून मारण्यात आले आहेत. शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते असा खोटा इतिहास आपल्यापुढे रचला गेला आणि त्या भरवशावर आम्ही खेड्यापाड्यात एकमेकांचे शेजारी एकमेकांचा द्वेष करायला लागलो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. जर आम्हाला खरे शिवाजी महाराज कळाले असते तर संपूर्ण महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या आणि गरीबांची मुलं रस्त्यावर कागदं वेचताना दिसले नसते, असेही सुभान अली म्हणाले. तर युवकांनी स्पर्धा परिक्षेद्वारे उच्च पदस्थ नोकर्‍या काबीज कराव्यात, ग्रामीण विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त गजानन घिरके यांनी सांगितले. तर पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन दसरकर, गजानन सावळे, सुनिल सावळे, संतोष ठोंबरे, दिपक सावळे, छगन दांदडे, ॠषिकेश गायकवाड, शिवराज दांदडे, पुरुषोत्तम सावळे, भागवत सावळे, उमेश गायकवाड, अनिल जवंजाळ, संदिप कुळसुंदर यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रंसंचलन भूषण सावळे यांनी तर प्रास्ताविक संदिप सावळे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.