Breaking News

प्रियंकाची राजकीय ‘एन्ट्री’ जोशात; चार दिवस उत्तर प्रदेशात ठाण; ‘रोड शो’ ला तुफान गर्दी


लखनऊः उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणिसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी आज पहिल्यांदाच लखनऊ येथे आल्या. त्यांनी काढलेल्या ‘रोड शो’ ला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रियंका उत्तर प्रदेशात चार दिवस ठाण मांडणार आहेत. कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या गाठीभेटी, लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करून नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर असेल.

प्रियंका उत्तर प्रदेशात येण्यापूर्वी त्यांचा एक ‘ऑडिओ’ संदेश प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी युवक, महिला आणि समाजाच्या दुर्बल वर्गाला नवीन भविष्य घडवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्व मिळून राजकारणात नवीन सुरुवात करू, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये काही पोस्टर्सवर प्रियंका यांना देवीच्या रुपात दाखवण्यात आले आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केले होते. प्रियंका यांनी सोमवारी लखनौमधून आपल्या राजकीय कारकीर्दीस औपचारिक सुरुवात केली आहे. तत्पूर्वी त्यांनी ट्विटवरही ‘एंट्री’ केली आहे. प्रियंका यांनी ट्विटर अकाऊंट सुरू केले असले, तरी त्यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढताना दिसते. त्यांनी सर्वांत प्रथम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना फॉलो केले आहे. त्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे, रणदीपसिंह सुरजेवाला, अहमद पटेल, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना फॉलो केले आहे.

प्रियंका यांचे पती रॉबर्ट वधेरा यांनी आपल्या पत्नीबाबत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. त्यामध्ये प्रियंकाला मी देशाच्या सेवेसाठी तुमच्याकडे सोपवत आहे, कृपया त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले आहे. प्रियंका यांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे प्रियंका यांच्यासोबत आहेत. लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय असा 15 किलोमीटरच्या मार्गावर हा ‘रोड शो’ झाला.


आता प्रियंका सेना

प्रियंका यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी पाहणार्‍या नेते-कार्यकर्त्यांनी ‘प्रियंका सेना’ तयार केली आहे. या सेनेचे सदस्य गुलाबी कपड्यांमध्ये दिसत आहेत.

आसामच्या सिलचरच्या काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘प्रियंका सेना’ची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी युवकांची वानर सेना बनवली होती. यामध्ये मुले आणि मुली दोघांचा समावेश होता. आता त्याचे अनुकरण प्रियंका करीत आहेत.