Breaking News

स्वप्निल सुतारचा खून कट रचून केल्याचा संशय


कराड (प्रतिनिधी) : मालखेड (ता. कराड) येथील स्वप्निल गणेश सुतार (वय 22, रा. पेठवडगांव, जि. कोल्हापूर) याचा पुर्वनियोजित कट रचून खून केल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने कराड पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.

स्वप्निल हा पुणे येथील हॉटेलमध्ये नोकरी करत होता. पेठवडगाव येथील नातेवाईकाचे लग्न असल्याने तो पेठवडगावला येण्यासाठी निघाला. त्याच्या करण नावाच्या मित्राने त्याला नवले पुलावरून एका आयशर टेम्पोत बसवले. टेम्पोत बसण्यापुर्वी स्वप्नीलने मित्रासमवेत मोबाईलमध्ये सेल्फी घेतला. त्यानंतर स्वप्नीलचा मोबाईल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भुईंज परिसरात स्विच ऑफ झाला असावा. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर फोन लागत नव्हता.

दरम्यान, सोमवारी रात्री 8 वाजता स्वप्नीलचा मृतदेह कराड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत निर्जनस्थळी ऊसाच्या शेतात सापडला. त्याच्या गळयावर वार केलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला होता. चिकटपट्टीने त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. स्वप्नीलचा मोबाईल स्विच ऑफ करून त्याच्या खिशात ठेवलेला होता. घटनास्थळावरील परिस्थतीवरून स्वप्नीलचा खून पुर्वनियोजित कट रचून केला असावा असा संशय पोलिसांना आहे. या संशयाच्या आधारे पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला असून दोन दिवसात तब्बल 55 जणांकडे चौकशी केली आहे. स्वप्नीलवर पाळत ठेवून त्याचा काटा काढल्याचे समोर येत असल्याने पोलिसांची दोन वेगवेगळी पथके पुणे व पेठवडगांव परिसरात तपासासाठी गेली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेनेही खुन प्रकरणी काहींकडे चौकशी केली आहे.