Breaking News

पारनेर सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे; याच्यासह पाच जणांचा अटकपूर्व जामीन नामंजूर


पारनेर/प्रतिनिधी : येथील सैनिक बँकेतून खातेदाराच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढल्याप्रकरणी बँकेचे चेअरमन व अधिकार्‍यांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत पाचरणे यांनी दि.19 जानेवारीला फिर्याद दिली होती व पारनेर पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता त्यांची सुनावणी दि. 11 रोजी होऊन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

बँकेच्या चेअरमनसह बँकेच्या अधिकार्‍यांनी अहमदनगर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अपील केले होते परंतु दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 3 वाजता सुनावणी होऊन बँकेच्या चेअरमन शिवाजी व्यवहारे यासह पाचही आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पारनेर सैनिक बँकेच्या संयुक्त खात्यातील रक्कम परस्पर काढून खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे याच्यासह अधिकार्‍यांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 19) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर सैनिक बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेत बँकेचे चेअरमन व अधिकार्‍यांकडूनच फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचे चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे, तत्कालीन शाखा व्यवस्थापक संजय बाजीराव कोरडे, तत्कालीन शाखाधिकारी अनिल नामदेव मापारी, तत्कालीन उपशाखाधिकारी प्रवीण नाथाजी निघुट, तत्कालीन पासिंग अधिकारी आप्पासाहेब बबन थोरात, कर्मचारी भरत गुजाबापू पाचरणे यांचा समावेश आहे
याबाबत चंद्रकांत विठ्ठल पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “मी व माझी पत्नी कुसूम यांचे पारनेर सैनिक सहकारी बँकेत सन 2001 पासून संयुक्त खाते आहे. दि. 13 जुलै 2013 रोजी सदर खात्यातून कुसूम पाचारणे यांच्या नावे काऊंटर स्लीपवर कोणीतरी अंगठा मारून पाठीमागील बाजूस मुलाचे नाव टाकून सही केली आहे. त्यावेळी खात्यातून 21 हजार रुपये काढून घेतले होते. ही बाब समजल्यानंतर चंद्रकांत पाचारणे यांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक संजय कोरडे यांना समक्ष भेटून तोंडी तक्रार केली होती. त्यावर कोरडे यांनी ‘तुमचे गेलेले पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर टाकू. तुम्ही कुठेही याबाबत तक्रार करू नका’, असे सांगितले. यासाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु, गेलेले रुपये पुन्हा खात्यावर टाकले नाही. उलट 30 मार्च 2014 रोजी त्यांच्या खात्यावर असलेल्या 39 हजार 336 रुपयांपैकी 1 एप्रिल 2014 रोजी सदर खात्यावर फक्त 678 रुपये असल्याचे दिसले. बँकेचे तत्कालीन पासिंग ऑफिसर उपशाखाधिकारी, शाखाधिकारी, शाखा व्यवस्थापक व बँकेचे चेअरमन यांनी संगनमत करून सदर खात्यावरील 38 हजार 678 रुपये खातेदाराच्या संमतीशिवाय काढून घेतले.’’
याप्रकरणी सहा जणांविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.