Breaking News

मलकापूरला गॅसच्या स्फोटात चार झोपड्या खाक


कराड,(प्रतिनिधी) : मलकापूर- आगाशिवनगर येथील दांगट वस्ती झोपडपट्टीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन टाकी फुटल्याने चार झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी (दि.26) दुपारी बारा वाजता ही घटना घडली. यावेळी झोपड्या बंद असल्यामुळे सुदैवाने कोणीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र वित्तहानी लाखो रूपये झाल्यांचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कराड अग्निशमन दल, कृष्णा हॉस्पिटल व इमर्सन कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी 11.55 वाजता आगाशिवनगर झोपडपट्टीमध्ये संदीप विनायक लाखे यांच्या झोपडीत अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की गॅस सिलिंडरचा टाकी झोपडीच्या छतासह सुमारे 30 फूट उंच उडाली. सुदैवाने सुदैवाने झोपडीत कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र या स्फोटांमध्ये लाखे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मंगल रघुनाथ लाखे, युवराज रघुनाथ लाखे, बाळू गणपत लाखे, राणी दिलीप लाखे यांच्या झोपडीलाही आगीची झळ बसली. त्यामुळे त्यांच्या झोपडीमध्येही संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. 

या परिसरात अनेक झोपड्या एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे नागरिकांनी आग विझविण्यासाठी झोपडीतील आसपासच्या घरांमधील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काही नागरिकांनी आगीची माहिती कराड नगरपालिका अग्निशामक दल, कृष्णा हॉस्पिटल अग्निशामक दल तसेच इमर्सन कंपनीतील अग्निशामक यंत्रणेला दिली. कृष्णा रुग्णालय व त्यानंतर काही वेळातच कराड नगरपालिकेचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर झोपड्यांना लागलेली आग आटोक्यात आली.