Breaking News

ट्रक उलटून दारूच्या हजार बाटल्या फुटल्या


वाई,(प्रतिनिधी) : वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटात विदेशी दारुचे एक हजार बॉक्स घेऊन जाणार्‍या माल ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो पलटी झाल्याने त्यातील बाटल्या फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालट्रकवरील (क्र. एमएच 04 एचडी 1232) चालक बाळू जानकीराम चौगुले (रा. नाशिक) हे नाशिकहून विदेशी महागडी दारुचे एक हजार बॉक्स भरुन कोल्हापूरकडे जात असताना तो वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटात भरघाव वेगात आले असता त्यांचा ताबा सुटल्याने मालट्रक पलटी झाला. त्यात ट्रकमधील बाटल्या फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने त्यात कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच सपोनि बाळासाहेब भरणे, सहाय्यक फौजदार बाबर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती घेऊन चालक बाळु चौगुले याच्याविरूध्द हवालदार रोहित तानाजी यादव यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास सपोनि बाळासाहेब भरणे सहाय्यक फौजदार बाबर करीत आहेत.