Breaking News

खडकपूर्णा नदीपात्रातील उपोषण आश्‍वासनाने पाचव्या दिवशी सुटले


देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): तालुक्यातील डिग्रस बु. व डिग्रस खुर्द या शिवारात असलेल्या खडकपूर्णा नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा करण्यात येत होता. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने नदीपात्रात 20 फेब्रुवारी पासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र महसूल प्रशासनाने माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समक्ष उपोषकर्त्यांना दिलेल्या लेखी आश्‍वासना नंतर 24 फेब्रुवारी रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले.

डिग्रस येथील रेतीघाटावर रात्रंदिवस अवैधरीत्या रेतीचा होत असलेला उपसा बंद करा. नियमबाह्य झालेल्या उपशाने नदीपात्रात झालेल्या खड्ड्यांचे प्रशासकीय स्तरावर मोजमाप करा. व संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करा यासह विविध मागण्यांसाठी डिग्रस येथील उपसरपंच छायाताई गजानन टेकाळे, मीरा गावडे, लक्ष्मण पर्‍हाड, रेखाताई पर्‍हाड, बाबुलाल वाड यांनी नदीपात्रात 20 फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आ. डॉ शशिकांत खेडेकर व प्रशासनाच्या वतीने उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र उपोषण सोडणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळे आ.डॉ.खेडेकर व अधिकारी यांना माघारी परतावे लागले. दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भेट देऊन परिस्थितीची विचारपूस केली.

त्यावेळी नायब तहसीलदार मदन जाधव, तलाठी गीते यांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते, माजी मंत्री डॉ. शिंगणे व महसूल अधिकाऱी यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषणकर्त्यांना मागण्यासंदर्भात लेखी आश्‍वासन देण्यात आले. उपोषणकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके. मतदारसंघ अध्यक्ष गजानन पवार, सभापती कल्याणीताई शिंगणे, राजु चित्ते, गजेंद्र शिंगणे, गजानन चेके,भरत पाटील, सचिन शिंगणे, फकिरा वाड, निवृत्ती पाटील, अरविंद पाटील, गणेश पर्‍हाड, भानुदास टेकाळे, उमेश पर्‍हाड, उद्धव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.