Breaking News

खा. उदयनराजे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

खा. उदयनराजे साठी इमेज परिणाम
सातारा ,  (प्रतिनिधी) : जागतिक ‘रोझ डे’ दिवशी सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना गुलाबाचा बुके दिला. दोघांमध्ये झालेल्या हास्य मैफलीमुळे उदयनराजेंच्या उमेदवारीचे फटाकेच फुटले. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उदयनराजेंसमवेत आगामी रणनीतीबाबत गांभीर्याने चर्चा करून त्यांना महाराष्ट्रभर फिरण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील या घडामोडींमुळे उदयनराजे हेच राष्ट्रवादीचे लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारक राहणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारालगतच्या माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे संकेत दिले असतानाच सातार्‍यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले हेही तिसर्‍यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त असून याबाबतची रणनीती दिल्लीत ठरल्याचे समजते. त्यानुसार उदयनराजे लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून समोर येणार आहेत. दरम्यान, खा. उदयनराजेंची शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्याशी ‘दिल की बात’ झाल्याची चर्चा आहे.
उदयनराजे राष्ट्रवादीतून उमेदवारी करणार की भाजपमधून, याविषयी अटकल बांधली जात होती. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे वाढलेले स्नेहसंबंध लक्षात घेता ते भाजपची उमेदवारी करतील, असे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी उदयनराजेंचे पूर्वांपार स्नेहसंबंध राहिले आहेत. त्यामुळे खा. पवार उदयनराजेंना डावलणार नाहीत, हे पक्के होते. मात्र कोणतीही खेळी योग्यवेळी खेळण्याची पवार स्टाईल सुपरिचित असल्याने पवार योग्य वेळी नेम साधून भात्यातून बाण बाहेर काढणार, हे निश्‍चित होते. उदयनराजेंनी सातार्‍यातील निवडक पत्रकारांना दिल्ली येथे संसद अभ्यास दौर्‍यासाठी आपल्या समवेत नेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उदयनराजेंशी भेट झाली. भेटीतील हास्यकल्लोळाचे वातावरण पाहता सातार्‍यातून उदयनराजे हेच राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असतील असे चित्र दिसून आले. शरद पवार कोणत्याही परिस्थितीत रिस्क घेवू इच्छित नाहीत, अशीच त्यांची देहबोली सांगून गेली.
उदयनराजेंनी त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. या भेटीत केंद्र सरकारच्या सध्याच्या कामगिरीवर दोघांनीही चर्चा केली. चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल म्हणाले, उदयनराजे तर राजे आहेत. आम्ही त्यांची प्रजा आहोत. उदयनराजेंसाठी त्यांची निवडणूक सोपी आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व शहरी मतदार संघावर आम्हाला अजून फोकस द्यायला हवा. उदयनराजेंना सातारा सोडून आता बाहेर पडावे लागेल. उदयनराजे तुम्ही महाराष्ट्रभर फिरले पाहिजे. तुम्ही राज्यात फिरला तर राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा होईल.
प्रफुल्ल पटेल व उदयनराजे यांच्यामधील संवाद पाहता राष्ट्रवादी उदयनराजेंना केवळ सातारा लोकसभा मतदार संघापुरती मर्यादित ठेवू इच्छित नाही. लोकसभा व त्यानंतर येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून उदयनराजेंना प्रोजेक्ट करण्याच्या मनस्थितीत राष्ट्रवादी आहे. त्यांच्या दिल्ली दौर्यात त्यांनी प्रफुल्ल पटेल व शरद पवार यांची मने जिंकली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
या सर्व घडामोडी सुरु असतानाच शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. शरद पवार जर माढा लोकसभा मतदार संघात लढणार असतील तर उदयनराजेंना ते डावलू शकत नाहीत. कारण माढा मतदार संघातील काही भागांमध्ये उदयनराजेंचा स्वत:चा वैयक्तिक प्रभाव आहे. कदाचित पवारांना माढ्यातून लढायचे असल्याने त्यांनी उदयनराजेंविरोधात कुणीही कागाळ्या केल्या तरी फक्त ऐकून घेण्याचेच काम केले. शरद पवारांनी माढा लढवण्याचा निर्णय केला तर पवारांना उदयनराजे हे तिथे हवेच आहेत. त्यामुळे पवार स्वत:च्या उमेदवारीसह उदयनराजेंची सातार्‍याची उमेदवारीही एकाचवेळी जाहीर करतील, असे समजते.