Breaking News

‘सुधारणा पुनर्वसना’नुसार आयुष्यातही सुधारणा व्हाव्या - न्या. कोठेकर


अहमदनगर/प्रतिनिधी : “आपण केलेल्या कृत्याबद्दल आपल्याला जाणीव व्हावी, पश्‍चाताप व्हावा अशाच प्रकारच्या सुधारणांचा उद्देश ठेवूनच कारागृहात देखील आपल्यासाठी यासर्व नियमांची कार्यवाही केली जाते. कारागृहाचे ब्रीदवाक्य ‘सुधारणा पुनर्वसन’ यानुसार भावी आयुष्यात देखील आपल्यामध्ये काही सुधारणा व्हाव्या, असे वाटत असेल तर निश्‍चितपणे कारागृहात ज्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्याचा यथायोग्य वापर करुन घेतला पाहिजे’’, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केले.

जिल्हा कारागृहातील बंदींसाठी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी न्यायाधीश कोठेकर बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश पद्माकर केस्तीकर, न्यायाधीश जी.जी.इटकळकर, न्यायाधीश श्रीमती एस.पी.केस्तीकर, न्यायाधीश एच.एस.सातभाई, प्राधिकरणचे सदस्य अ‍ॅड. प्रशांत मोरे, कारागृह अधीक्षक एन.जी.सावंत, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना न्यायाधीश श्रीमती एस.पी. केस्तीकर यांनी गुन्ह्याच्या ‘प्ली बार्गेनिंग’ विषयावर मार्गदर्शन करुन गुन्ह्यातून लवकर मुक्त होण्यासाठी जर बंदींंनी गुन्हा कबूल केल्यास संबंधित गुन्ह्यात तडजोड करुन 7 वर्षाखालील गुन्ह्यांमध्ये अर्धी किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा होऊन लवकरात लवकर कारागृहातून सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी केले तर आभार कारागृह अधीक्षक एन.जी. सावंत यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक श्री.नगरकर, अ‍ॅड.शिरसूल, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय खंडागळे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.