Breaking News

हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू


श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

बडगामपासून सात किलोमीटरवर असलेल्या गरेंद कलन गावात आज सकाळी ही घटना घडली. अपघातग्रस्त विमान 'एमआय-१७' जातीचे असून अपघातानंतर स्फोट होऊन भडकलेल्या आगीत विमान जळून खाक झाले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती; मात्र अपघात झाल्याचे कळल्यानंतर लोकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनेची चौकशी सुरू आहे. 

दरम्यान, आम्ही भारताची 2 विमाने पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतले आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमाने काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमाने आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. भारतीय हवाई दलाचे विमान जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे कोसळल्यानंतर आता हवाई दलाचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.