Breaking News

दखल - अतिरंजीत स्वप्नरंजन


मोठीं स्वप्नं जरूर पाहावीत. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करावेत; परंतु एखादं स्वप्न पूर्ण होत नसेल, तर त्याचा नाद सोडून दुसर्‍या; परंतु तितक्याच महत्त्वाच्या स्वप्नपूर्तीच्या मागं लागावं. स्वप्न पाहताना ते कितपत पूर्ण होण्याची शक्यता आहे, हे पडताळून पाहावं. तसं केलं नाही, तर केलेल्या बाताचं हसू होतं. भाजपचं सध्या तसं झालं आहे. शरद पवारांचा पराभव करण्याचं आणि बारामती ताब्यात घेण्याचं स्वप्न सध्या भाजपच्या अनेक नेत्यांना पडतं आहे. ही स्वप्नपूर्ती करण्याच्या नादात राज्य आणि देश जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहू शकतं.

भारतीय जनता पक्ष केडरबेस पक्ष आहे. त्याच्याकडं कार्यकर्त्यांचं जांळं आहे. देशात दहा कोटी सभासद असलेला हा एकमेव पक्ष आहे. जगातही एवढे सभासद असलेला हा एकमेव पक्ष आहे. आता तर या पक्षानं पाच कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकावण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे वीस कोटी लोकांपर्यंत हा पक्ष पोचला असं म्हणता येईल. पक्षाच्या कल्पकतेला द्ाद द्यायलाच हवी; परंतु लाभार्थीच्या घरावर झेंडा फडकावण्यात कर्तृत्त्व कसलं? सरकारी योजना या कोणत्याही पक्षाच्या नसतात. त्या करदात्यांच्या पैशातून राबविल्या जात असतात; परंतु तेवढं भान भाजपला नाही. पक्षाचा आत्मविश्‍वासच एवढा दांडगा, की त्रिपुरा जिंकलं, आता केरळ जिंकू, असं त्या पक्षाला वाटायला लागलं आहे. शत प्रतिशत भाजप असं नाही तरी त्या पक्षाचं ब्रीदवाक्य होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तीनशेहून अधिक जागा भाजप जिंकेल, असं सांगितलं. त्यांना भाजपचं चाणक्य म्हटलं जातं. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देश जास्त माहीत असावा. त्यांनी 330 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. गिरीश महाजन यांना तर मोठा आत्मविश्‍वास आहे. तो असायलाही हरकत नाही. सर्वांत अगोदर बारामती जिंकण्याची भाषा त्यांनी केली. लोकशाहीत मतदारांना ज्याचं काम, विचारसरणी आवडत असते, त्याला लोक मतदान करतात. लोकांना गृहीत धरायचं नसतं; परंतु शाह, फडवणीस, महाजन आणि चंद्रकांतदादा यांना ते कोण सांगणार? त्यातील चंद्रकांतदादा तर कधीच लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत. शिवाय बारामतीच्या विकासाचं कौतुक यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनीही वारंवार केलं आहे. बारामतीला गेलं, की पाहुणे म्हणून चार शब्द कौतुकाचे बोलायचे आणि पाठ फिरली, की टीका करायची अशी दुतोंडी भूमिका भाजपचे नेते घेत असतात. त्यांच्यापेक्षा मग रामदास आठवले बरे असं म्हणण्याची वेळ आली आहे.
भारतीय जनता पक्षाला सध्या काहीही दिसत नाही. या पक्षाच्या नेत्यांना सध्या फक्त लोकसभेची निवडणूक आणि त्यातला विजय दिसतो आहे. तसा तो दिसायलाही हरकत नाही. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं वेगळं आणि परिस्थिती लक्षात घेऊन भाष्य करणं वेगळं. तारतम्य हरवलं, की कधी कधी पश्‍चाताप करण्याची वेळ येते. रणांगणात उतरायचं असेल, तर समोर कोण आहे, त्याच्या जमेच्या बाजू काय आहेत, त्याचे अवगुण कोणते हे पाहायचं असतं. भाजपला त्याचाच नेमका विसर पडला आहे. बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर गेल्या 55 वर्षांत पवार सांगतील, तोच उमेदवार बारामतीच्या जनतेनं निवडून दिला आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनेलचा पराभव करणं वेगळं आणि सार्वत्रिक निवडणुकीत पवार यांचा उमेदवार पराभूत करणं वेगळं. त्यातला फरक बारामतीच्या जनतेला कळतो. त्यामुळं पवार यांना आतापर्यंत अनेकांनी आव्हानं दिली. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कितीतरी लाटा आल्या, गेल्या; परंतु बारामतीकरांचं पवार यांच्यावरचं प्रेम कायम राहिलं. आतापर्यंत एकही पराभव वाट्याला न येणारा हा एकमेव नेता असावा. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरही मतदारांचा असाच लोभ आहे. लोकसभा असो, की विधानसभा; राज्यभर प्रचार करायचा आणि शेवटच्या दिवशी फक्त मतदारसंघात सभा घ्यायच्या. असं असूनही बारामतीकरांनी कायम पवार यांना आपलं मानलं. भाजपचं सरकार असतानाच्या काळातही सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतलं काम पाहून त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. त्यांची लोकसभेतील उपस्थिती, त्यांचं संसदीय चर्चात सहभागी होणं आणि विविध विषयांवरचा त्यांचा अभ्यास पाहता कामगिरीच्या बाबतीत महाराष्ट्रातील एकही खासदार त्यांच्या जवळपासही पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय मतदारसंघातही त्यांचा संपर्क चांगला आहे. मागच्या वेळी देशभर मोदी लाट असल्यामुळं सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य कमी झालं. भाजपचा उमेदवार नव्हता, म्हणून अपयश आलं आणि आता भाजपचा उमेदवार देणार असल्यामुळं तिथं सुळे यांचा पराभव करता येईल, असं भाजपच्या नेत्यांना वाटत असेल, तर त्यांना स्वप्नात राहू देणंच जास्त चांगलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील दोन-चार शेतकर्‍यांना पढवून पवार यांच्यावर मतदार नाराज असल्याचं भासविण्यात येत असलं, तरी भाजपच्या नेत्यांना अजून पवार यांची गुगली कळलीच नाही असं म्हणावं लागेल. विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर, वसंत साठे, बाळासाहेब विखे यांना ती चांगलीच कळली होती.
उत्तर प्रदेशानंतरचं महाराष्ट्र हे लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघ असलेलं राज्य. या राज्यात 48 मतदारसंघ आहेत. खरं तर सर्वंच्या सर्व जागा जिंकू, असं सांगणं वेगळं आणि गेल्या वेळच्या जागेत एका जागेची भर पडेल आणि ती बारामतीची असेल, असं सांगणं वेगळं. शाह यांना तर 45 पेक्षा कमी जागा जिंकणं हे अपयश वाटतं. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विधानांचा गांभीर्यानं विचार क रायला हवा. मुख्यमंत्र्यांनी तो केलेला दिसतो आणि त्यांचा विश्‍वास इतका दांडगा, की महाजन यांच्या सुरात सूर मिसळून त्यांनी 43 वी जागा बारामतीची असेल, असं ठासून सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांत त्यांनी भाजपला देशभऱात 330 जागा मिळतील असं सांगितलं. त्यांच्या आत्मविश्‍वासाला दादच द्यावी लागेल. एकीकडं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ज्योतिषी असं म्हणायचं आणि दुसरीकडं निवडणुकीच्या निकालाचं भाकित करून आपणच ज्योतिषी आहे, हे दाखवायचं ही मुख्यमंत्र्यांची दुहेरी नीती दिसते. ईशान्येकेडील राज्यात भाजपचं वर्चस्व होतं. नागरिकत्त्व क ायद्यामुळं तिकडं असंतोष आहे. पुरस्कार वापसीचं सत्र तिथं सुरू आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांची युती झाली आहे. प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. एक एक मित्रपक्ष भाजपला सोडून जायला लागला आहे. भाजपविरोधात देशात विरोधी पक्षांची महाआघाडी आकाराला येते आहे. विविध पाहण्यांचे अहवाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं नमूद करतात. मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. भाजपला गेल्या वेळच्या निवडणुकीत 282 जागा मिळाल्या होत्या. पोटनिवडणुकीत 11 जागा कमी झाल्या आहेत. देशपातळीवरचं चित्र पाहता भाजपच्या शंभर जागा कमी होऊन त्या दोनशेच्या आत येतील, असा सर्वांचा अंदाज आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांना 330 जागांचा साक्षात्कार व्हावा म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पडण्यासारखंच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच्या युतीचं घोडं अजून पेंड खात नाही. रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतो आहे. शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागतील. असं असताना भाजप महाराष्ट्रात 43 जागा कशा जिंकणार, असा प्रश्‍न निर्माण होतो. युती झाली नाही, तर भाजपच्या जागांची संख्या 15 च्या आत येतील. त्यातही शरद पवारांचा मतदारसंघ खेचून आणण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे फार मोठी झेप आहे. बारामतीचा विकास, तिथल्या रस्ते-पाणी यांच्या विकासकामांची तुलनाच होऊ शकत नाही. तिथलं नाटयगृह असेल, बाजारपेठा असतील सर्व काही विकसित आणि योजनाबद्ध करून एका यशस्वी नेत्याचा मतदारसंघ कसा असला पाहिजे याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं. देशातील सर्वोच्च पदे भोगणार्‍या नेत्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास साधता येत नाही आणि देशाच्या विकासाच्या गप्पा केल्या जातात; पण शरद पवारांनी तसं होऊ दिलं नाही. जगातली कोणतीही गोष्ट बारामतीत नाही असं नाही, याची जाणीव तिथल्या नागरिकांना आहे. असं असताना भाजपनं बारामती जिंकण्याचं स्वप्न पाहिलं असलं, तरी त्यांना ते खुशाल पाहू द्यावं.