Breaking News

दहिवडीत हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ यांचा शुक्रवारपासून उरुस


म्हसवड (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक संबोधले जात असलेले दहिवडी येथील प्रसिध्द हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफचा 22 वा उरूस शुक्रवार (दि. 15) ते सोमवार (दि. 18) दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त दर्गाह व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. महेश वसव यांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता चंद्रकांत शंकरराव वसव यांच्या निवासस्थानाहून संदल, झेंडा, चादर यांची मिरवणूक दहिवडी शहराच्या मुख्य रस्त्याने दर्गाह शरीफ येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. त्यानंतर दर्गाह मधील दुर्बतवर धार्मिक विधीपुर्वक संदल, फूल, चादर चडविली जाईल व महाप्रसाद होईल. रात्री दहा वाजता ‘मिलाद शरीफ’ चा कार्यक्रम होईल. गुरुवारी ऊसाचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी दर्गाह सर्व जाती-धर्मातील भाविक भक्तांना दर्शनास खुले राहील.. सायंकाळी सहा ते आठ वाजता गायक (व्हाईस ऑफ महेंद्र कपूर) शशिकांत व त्यांच्या सोबतच्या गायकांचा सदाबहार हिंदी मराठी फिल्मी गीत आणि कव्वाली गाण्यांचा मनोरंजन शानदार कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता बारामती येथील प्राचार्य कोतमिरे यांचे प्रवचन होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम व रात्री नऊ वाजता बारामती येथील प्रसिध्द कव्वाल जनाब समीर कादरी, जनाब अस्लम कव्वाल यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी बाबांची शाही झेंडा मिरवणूक दुपारी तीन वाजता दर्गाह शरीफ मधून निघेल.


या मिरवणुकीत विविध नामांकित बँड, बेंजो, झांज पथक, हलगी पथक, गजी पथके सहभागी होणार आहेत. याबरोबरच प्रसिध्द रातब, दांडपट्टा, घोडे व इतर आकर्षक देखाव्याचाही सहभाग राहिल. ही शाही मिरवणूक दहिवडी शहराचे मुख्य रस्त्याने रात्री आठ वाजता दर्गाह शरीफमध्ये त्यानंतर रात्री आठ वाजता मिरवणुकीची सांगता केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी दर्गाह मध्ये जियारत या धार्मिक विधीने या ‘उरुस शरिफ’ महोत्सवाची सांगता केली जाणार आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थ, हिंदु व मुस्लिम समाज बांधव, भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. वसव यांनी केले.