Breaking News

धैर्यशील पाटील सातार्‍याचे भूषणच : राजमाता कल्पनाराजे; प्रतापसिंहराजे महाराज कला, क्रीडा व सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा


सातारा (प्रतिनिधी) : अ‍ॅड. धैर्यशीलदादा हे खर्‍या अर्थाने सातार्‍याचे भूषण आहेत. त्यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्याचा सातारा नगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य आहे, असे उद्गार राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी काढले.
'
सातारा नगरपालिका आणि नगरपरिषद शिक्षण समिती यांच्यावतीने शाहूकला मंदिरात आयोजित कार्यक्रमात (कै.) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (दादा) कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव काल उत्साहात पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांना प्रतापसिंहराजे महाराज पुरस्कार, तर उत्कृष्ट पालिका पुरस्कार पाचगणी आणि कराड नगरपालिकांना देण्यात आले. याशिवाय शहरातील अकरा पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

व्यासपीठावर राजमाता कल्पनाराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून नगराध्यक्षांसह विविध मान्यवरांनी सत्कार केला. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाल्यावर आपल्या प्रास्ताविक भाषणात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के म्हणाले की, हा पुरस्कार देण्यासाठी पालिकेने समिती स्थापन करुन योग्य व्यक्तींची निवड केली. क्रीडा क्षेत्रात सातार्‍याचे नाव उज्वल करणार्‍या खेळाडूंचाही गौरव करताना विशेष आनंद होतो. सन 2008 पासून हे पुरस्कार पालिका प्रदान करत असून आजवर अनेक मान्यवरांना यावेळी गौरवण्यात येत आहे. याचा मोठा आनंद होतो.

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आपल्या मनोगतात म्हणाल्या, या पुरस्कार प्रदान सोहळ्यामुळे सातारा पालिका आणि सातारा शहराचे नाव राज्यभरात पोहोचले आहे. आणि खर्‍या अर्थाने पालिकेकडून या पुरस्काराला वेगळी उंची प्राप्त होत आहे. पालिकेच्या बजेटमध्ये पत्रकार व अन्य मान्यवरांच्या पुरस्कारासाठी विशेष तरतूद करणारी सातारा ही देशातील एकमेव पालिका असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी या वेळी सांगितले.
सातार्‍याचे नाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर झळकावणार्‍या ललिता केशव, सोनाली हेळवी, आर्या देशपांडे, वैष्णवी पवार, सुदेष्णा शिवणकर, मयुरी देवरे, मोहन घोरपडे, ईशान शानबाग, यश राजेमहाडीक, तेजराज मांढरे, यासर मुलाणी यांनाही या वेळी पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आजचा कार्यक्रम पाहून पारणे फिटले. कारण नसताना खूप कौतुक झाले. आता मला कोणाची दृष्ट लागणार नाही. आयुष्यात कमवायचे तरी काय. आयुष्य कधी गेले समजले नाही. कॉलेजला दांडी मारत होतो. प्रेम असेच राहू द्या. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. सर्वांसाठी जगणार. प्रत्येकावर प्रेम करणार. सर्वांवर खूप प्रेम करतो. दादांचा आदर्श घेऊन मी वाटचाल करतो. मला सर्वांनी प्रेम दिले. माझे पारणे फिटले. असाच राहणार. काहीही बदल होणार नाही. फक्त तुमच्यात बदल होऊन देऊ नका. गाणं ऐकल्याशिवाय मजा पण येत नाही, म्हणून एक गीतही सादर करतो. खर्‍या अर्थाने अ‍ॅड. धैर्यशीलदादाच खासदार हवे होते. त्यांनी आणखी न्याय दिला असता.

सत्काराला उत्तर देताना अ‍ॅरड. धैर्यशील पाटील म्हणाले, आपल्याला इतिहास नावडता झाला आहे. 1881 ला कास तलावाचे काम सातारा पालिकेने सुरू केला. 1886 ला त्याचे काम पूर्ण झाले. महाबळेश्‍वरचा शोध महाराजांनी लावला. मात्र महाराजांच्या विरोधात ब्रिटिशांचे कान भरले गेले. त्यांनी महाराजांना गादीवरून बाजूला केले. नेहरू पुरस्कारापेक्षाही मला हा पुरस्कार फारच महत्वाचा वाटतो. कारण हा पुरस्कार घरचा आहे. मी सातारा नगरपालिका शाळेत शिकलो त्याचा मला अभिमान आहे. आपण सर्वसामान्य माणसांसाठी काम करणे आवश्यक आहे. मी लहान असताना दास कॅपिटल वाचत असताना चक्क झोप आली. नंतर मी ते पूर्ण वाचले. जीवन कायद्यापेक्षा विस्तृत आहे. माझ्या भूमीने माझा सत्कार केला, याची मला कृतार्थता वाटते. राजमाता कल्पनाराजे म्हणाल्या की, खरं तर अ‍ॅड. दादांना पुरस्कार देण्यात पालिकेने खूप उशीर केला आहे. पालिका प्रशासनाने सुधारणा करायला हव्या आहेत. दादा ग्रेट आहेत. त्यांच्यापुढे आम्ही नतमस्तक आहे. सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती प्राईड ऑफ सातारा आहेत. या सर्वांना भविष्यातील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहल दामले यांनी केले. समारंभास संभाजीराव पाटणे, अ‍ॅड. सौ. दीपा पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कराडकर, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, निशांत पाटील, अ‍ॅाड. आप्पासाहेब उत्तेकर यांच्यासह सातारा नगरपालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगसेविका व सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.