Breaking News

संत रविदासांची संकल्पना संत रविदासांची संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणलीअंमलात आणली


 बुलडाणा,(प्रतिनिधी): बेरोजगारांच्या हाताला काम, उपाशी पोटाला अन्न,  गरिबांना शिक्षण व सर्वांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही खरी  कल्याणकारी राज्यांची संकल्पना आहे. हे सुत्र संत रविदासांनी मांडले  होते, हीच संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडून ती  अमलात आणली. मात्र आजच्या राज्यकर्त्यांनी या संकल्पनेला तिलांजली देत  जनतेच्या नागरी हक्कावरच गदा आणली आहे.

अशा राज्यकर्त्यांना आता धडा  शिकवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, व्याख्यात्या  प्रा.सुषमाताई अंधारे यांनी व्यक्त केले.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने संत रविदास, छत्रपती  शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा व रमाई जयंतीच्या निमित्त बुलडाणा येथे  शुक्रवारी प्रा.सुषमा अंधारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी बी. ओ. बोर्डे तर उदघाटक म्हणून  मो. सज्जाद उपस्थित होते. विचारपिठावर माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश  घेवंदे, माधवराव हुडेकर, डॉ.राजेश्‍वर उबरहंडे, आर. आर. बिबणे, गोविंद  हिरेकर, जयश्रीताई शेळके, वैशालीताई इंगळे, शर्वरीताई तुपकर, नंदिनीताई  टापरे, यांची उपस्थिती होती.  नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा आणि त्यावर महापुरुषांच्या विचारांची  सांगड घालत तुमच्या जगण्याचा प्राधान्यक्रम काय आहे. असा थेट प्रश्‍न  करीत आपले हक्क व अधिकार आपल्याला मिळतात काय? याचा विचार करून येणार्‍या  काळात आपली विवेक बुध्दी जागृत ठेवून 2019 च्या निवडणुकांकडे आपण बघितले  पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विद्यमान भाजप सरकारवर टिका करताना प्रा.  अंधारे म्हणाल्या की, हा देश एका संक्रमण काळातून जात आहे. जे लोक  देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटप करीत फिरत आहेत ते खरे देशभक्त आहेत काय? हे  तपासून घेण्याची वेळ आली आहे. कारण याच बुलडाणा जिल्ह्याचे दोन जवान  देशासाठी शहीद झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना आणि संपूर्ण  जिल्हा शोकसागरात बुडालेला असताना त्याचवेळी पंतप्रधान विदर्भात  पांढरकवडा येथे भाषण देत होते, पण त्यांना शहिदांच्या घरी भेट द्यावीशी  वाटली नाही, ही शोकांतिका असल्याच्या त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला  मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची  सांगता झाली.