Breaking News

मागे राहतील त्यांना हात, आधार द्या : श्रीनिवास पाटील


पाटण (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासारखे काही तरी असते. ज्याला जमेल तसे वस्तू, वेळ, पैसा आणि श्रम यांचे योगदान करत समाजाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला पाहिजे तरच घडणारा समाज भावी पिढीसाठी पुढे योगदान देईल. जे मागे राहतील त्यांना हात द्या, आधार द्या, असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

श्रीनिवास पाटील यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्ताने एस. बालन समूह व परिवर्तन संस्था पुणे यांच्यावतीने गांधीटेकडी (ता.पाटण) येथील ठक्करबाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना 80 सायकल, 100 स्कूल बॅग व कराड, पाटण तालुक्यातील 10 शाळांना सगंणक भेट देण्यात आले. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, एस. बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत घुले-पाटील, राष्ट्रवादी आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, समाजात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात प्रगतीपथावर असला तरी तुमच्यासोबत जे मागे राहिलेले लोक आहेत, नवी पिढी आहे त्यांना हात देणं, आधार देणं ही तुमची जबाबदारी आहे. तन, मन आणि धनाने समाजाला जे काही करता येईल ते करत रहा म्हणजे एक सुशिक्षीत आणि संस्कारक्षम समाज तयार होईल.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या सायकली, कॉम्प्युटर यातून समाज घडणार आहे. नव्या पिढीसाठी हे प्रोत्साहन असून त्यासाठी आपण आपली जबाबदारी उचलली पाहिजे. पुनीत बालन म्हणाले, श्रीनिवास पाटील साहेबांचे प्रशासकीय, राजकीय, सामाजिक कार्य मोठे आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. त्यांचे दातृत्व मोठे असून त्यांनी आपल्या जीवनप्रवासात वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानून प्रेरणा घ्यावी. आपल्या कमाईतील काही हिस्सा समाजासाठी उपयोगात आणला पाहिजे. वंचिताना याचा लाभ मिळाल्यास त्यांनी दिलेल्या आशिर्वादाने ऊर्जा मिळते. पाटण तालुक्याच्या प्रत्येक गावात ग्रंथालये सुरू करण्याचा मानस असून त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असे सांगून त्यांनी शाळेसाठी एक लाख रूपयांची मदत जाहीर केली. स्वागत प्राचार्य डी.जी. नांगरे यांनी केले.