Breaking News

राजेंद्र शेळके यांना शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार


सातारा (प्रतिनिधी) : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, साध्या पत्र्याच्या घरात वाढलेल्या, गावातल्या झेडपीच्या शाळेत शिकलेल्या राजेंद्र शेळके यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला. गावच्या सुपुत्राने मिळवलेल्या पुरस्काराने गावकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.

सातार्‍यापासून जवळच असलेल्या शेळकेवाडीतील राजेंद्र शेळके यांनी रोईंग या खेळाच्या माध्यमातून मोठा लौकिक संपादन केला असून त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने भरलेला आहे. आई समिंद्रा अन् वडील प्रल्हाद शेतीत राबणारे. पुढे शेळके हे लष्करी सेवेत रुजू झाले. तिथेच त्यांना रोईंग या खेळाची आवड निर्माण झाली. 1994 मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकाविले आहे. त्यावर्षीच त्यांना राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही गौरविण्यात आले. निवृत्तीनंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. त्यादृष्टीने चीन येथे त्यांनी प्रशिक्षणविषयक अभ्यासक्रमही यशस्विरित्या पूर्ण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर घडलेले कित्येक खेळाडू ऑलिंपिकपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सायली अन् स्नेहल या दोन्ही मुलीही क्रीडाक्षेत्रात निष्णात आहेत. त्यांनीही राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे. सुवर्णपदक पटकाविले आहे.