Breaking News

मोदीविरोधांत विरोधकांचे उपोषणाचे आणखी एक हत्यार


नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एका दिवसाचे उपोषण केले. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन केल्यानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत उपोषणाचे अस्त्र उगारले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. मोदी राज धर्माचे पालन करत नसल्याचा आरोप चंद्राबाबू यांनी केला.

नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे माजिद मेनन यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नायडूंची भेट घेऊन पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंटूर इथे जाऊन चंद्राबाबू यांच्यावर हल्ला चढवला. त्याचा वचपा काढण्यासाठी चंद्राबाबू यांनी मोदींच्या पत्नींचा उल्लेख केला. विभाजनानंतर आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रार करीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेलुगु देसम पक्षाने घेतला होता. त्यानंतर मात्र चंद्राबाबूंनी मोदी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. भाजपला रोखणे हाच एकमेव प्रादेशिक राज्यांतील नेत्यांचा उद्देश दिसून येतो आहे.

केवळ मोदी यांना विरोध नव्हे, तर राज्य वाचविणे हे आव्हान प्रादेशिक नेत्यांसमोर आहे. म्हणूनच ममता यांच्या नंतर आता चंद्राबाबूंनी उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे. लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच तिथे विधानसभेच्याही निवडणुका आहेत. अशा वेळी वायएसआर काँग्रेस व भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन या दोन्ही निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आंध्र प्रदेश अस्मितेचा मुद्दा नायडू यांनी उकरून काढला आहे.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी नायडू यांनी उपोषण केले. त्यापूर्वी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी वैयक्तिक टीका थांबवावी असे आवाहन नायडू यांनी केले. राज्याची निर्मिती करण्यात आली, त्या वेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली.

उपोषणाच्या वेळी एकाची आत्महत्या

या उपोषणामध्येच आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. त्याने आपली स्थिती खराब असल्याचे नोटमध्ये नमूद केले आहे.