Breaking News

बंधार्‍याच्या निकृष्ट कामाविरोधात नागलवाडी ग्रामस्थांचे उपोषणकर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चालू असलेल्या सिमेंट बंधार्‍याचे काम निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली. हे काम थांबविल्याच्या रागातून नागलवाडीचे माजी उपसरपंच धनंजय बरकडे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास कापरे यांना संबंधित ठेकेदार व इतरांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ नागलवाडी सरपंच यांनी ग्रामस्थांसह सोमवारपासून नागलवाडी येथील नागेश्‍वर मंदिरासमोर उपोषण सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनानूसार नागलवाडी येथील ढगीनदी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चालु असलेले बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे असून चालू असलेल्या बंधार्‍याचे निकृष्ट कामाची व संबंधितांनी अनधिकृतरित्या केलेल्या वाळू उपशाची चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित ठेकेदार व त्याचे सहकारी यांच्यावर राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. निवेदनावर उपोषणकर्ते ताराचंद बलभिम पांडुळे, पोपट परभती मते व इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. नागलवाडी येथील मोठ्याा संख्येने ग्रामस्थ उपोषणात सामील झालेे आहेत.