जेव्हा पाण्यात बोट बंद पडते


देवळाली प्रवरा / प्रतिनिधी: चारही बाजूंनी अथांग पाणी. धरणाच्या मध्यावर अचानकपणे बोट बंद पडते. बोटीमध्ये विद्यर्थ्यांसह 20 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतो. तब्बल तासभर धरणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या बोटेला दुसर्‍या बोटेने टोचण करून काठावर आणले जाते. बोट कडेला  आणल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. ही घटना घडली मुळा धरणाच्या पाण्यातील वावरथ जांभळी ग्रामस्थांना घेऊन जाणाऱ्या लाँचमध्ये.

वावरथ जांभळी भागातील ग्रामस्थांना दैनंदिन मुळा धरणाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर शासनाकडून लाँच देण्यात आली. मात्र, ग्रामस्थांची धरणावर उड्डाणपूल बांधून मिळण्याची मागणीला शासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली.. परिणामी नियमितपणे पाण्यातून प्रवास करताना जीव मुठीत घेत वाट काढण्याचा प्रकार अजूनही सुरूच असल्याचे या घटनेने दिसून आले. 

सायंकाळच्या 5 वाजेच्या दरम्यान, वावरथ, जांभळी भागाकडे जाण्यासाठी धरणातून लाँच निघाली होती. अचानकपणे लाँच धरणाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर लाँचचा पंखा मासेमारी करण्यात येणार्‍या जाळ्याच्या फासामुळे बंद पडला. यावेळी लाँच धरणाच्या मध्यभागी उभी राहिली. लाँचमध्ये वावरथ व जांभळी येथील  जिल्हा परिषद शाळेतील 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी लाँचने प्रवास करून राहुरी येथे आले होते. परीक्षा आटोपल्यानंतर हे विद्यार्थी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बारागाव नांदूरमार्गे पुन्हा लाँचने प्रवास करून परतीच्या प्रवासाला निघाले होते. विद्यार्थ्यांसह ११ सहप्रवासी आणि आठ दुचाक्याही होत्या. प्रसंगावधान राखून लाँचचालकाने मासेमारीचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराला या घटनेची खबर देऊन दुसरी छोटी लाँच बोलाविली. तासाभरानंतर  बंद पडलेल्या लाँचला बाहेर काढण्यासाठी ठेकेदारांनी  लाँच पाठवून दिली. दुसरी छोटी लाँच आल्यानंतर तिला टोचण करून धरणाचा काठ गाठण्यात आला.  यामुळे  20 प्रवाशांची सुखरूप सुटका झाली.
 यावेळी अर्जुन पवार, शिवाजी माळी, गोरख बाचकर सुरेश पवार, शिक्षक पटारे, बाचकर, नांगरे, जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, वावरथचे उपसरपंच पाटीलबा बाचकर, वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्‍वर बाचकर, गोपीनाथ खेमनर, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या लाँचमध्ये शुभम बाचकर, चैतन्य बाचकर, आरोग्यसेविका रंभाताई बाचकर, बाळासाहेब बर्डे, चंद्रभागा बाचकर, विमल तमनर, सागर तमनर, सोन्याबापू बाचकर, गणेश बाचकर, राहुल बाचकर, सोमनाथ बाचकर आदी प्रवासी होते.

सन 2002 सालच्या घटनेला उजाळा
वावरथ जांभळी येथील लाँच सन 2002 साली पाण्यात बुडाली होती. त्यावेळी 40 प्रवाशी पाण्यात बुडाले होते. त्यापैकी 3 जणांना जलसमाधी मिळाली होती. सदरची घटना घडलेली असताना पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती आज घडते की काय? असेच काही लाँचमध्ये बसलेल्या प्रवाशांना वाटले होते. सुदैवाने वादळ वारा यावेळी नव्हता यामुळे हानी टळली

शासन बुलेट ट्रेन व विमान तळाची निर्मिती करीत असल्याचा गवगवा करीत आहे. शहरी भागातील लोकांप्रमाणे आमच्या ग्रामिण भागातील समस्या शासनाने लक्षात घेत आम्हालाही दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी. मुळा धरणावर पूल बांधणीची मागणी पूर्ण करावी.-
     ज्ञानदेव बाचकर, माजी उपसरपंच,वावरथ

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget