दख्खन व मानिनी जत्रा उदघाटनप्रसंगी मंत्री महादेव जानकर यांचे सातार्‍यात प्रतिपादन


सातारा (प्रतिनिधी) : राज्य व केंद्र शासनाने महिला बचत गटांसाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा बचत गटांनी लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती करुन महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. पुणे विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन दख्खन व मानिनी जत्राचे उद्घाटन आज पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पुणे महसूल विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती राजेश पवार, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मनोज ससे, अविनाश फडतरे, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, आशा, पर्यवेक्षिका ह्या गावपातळीपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवत असतात, असे सांगून पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर पुढे म्हणाले, दुष्काळी भागातील बचत गटांनी दुग्ध व्यवसाय, पशुपालन असे व्यवसाय करावे. सातारा जिल्हा परिषदेने मानिनी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटांना चांगले मार्केट उपलब्ध करुन दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, बचतगटांना जे काही सहकार्य लागेल शासनाच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्‍वासनही पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यांनी शेवटी दिले.
सात वर्षांनतर पुणे विभागीय विक्री प्रदर्शन भरविण्याचा मान सातारा जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या प्रदर्शनामध्ये पाच जिल्ह्यातील बचतगटांचा समावेश असून याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील बचत गटांना होणार आहे. अनेक बचत गट, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय करतात यातून आता त्यांनी पुढे आले पाहिजे व नाविन्यपूर्ण व्यवसाय केले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर यांनी दिले.
बचत गटाच्या महिला आज स्वत:च्या पायावर अभ्या राहिल्या आहेत तुम्ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आदर्श आहात. आज तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही इथपर्यंत आला आहात, यापुढे तुमच्या मुली, सुनांना शिक्षण दिले पाहिजे. मुलींना शिक्षणासाठी, पुणे, मुंबईला पाठवा त्यांच्या निर्णयाला पाठींबा द्या. तसेच तुमच्या संपर्कात येणार्‍या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त करा. तसेच एका तरी महिला बचत गटाने एमपीएससी व युपीएससी अभ्यास केंद्र उभे करण्यासाठी पुढे यावे या केंद्रास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी दिले.
हिरकणी महाराष्ट्राची हा महिला बचत गटांसाठी कार्यक्रम आता शासनामार्फत राबविण्यात येणार असून जिल्ह्यातून 10 बचत गटांची निवड करुन त्यांना 5 लाखचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्लॅस्टीक बंदी मुळे कागदी पिशव्यांना बाजारपेठेत खूप मागणी आहे. बचत गटांनी या उद्योगाकडे वळावे. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करुया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले. या कार्यक्रमास महिला, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget