Breaking News

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळा : ॠषिकेश कोराणे


मसूर (प्रतिनिधी) : गतीमान जीवनात आपली कर्तव्ये पार पाडताना सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्येकाने केवळ सुरक्षा अभियानापुरतेच न पाळता नेहमीच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावे व स्वत: बरोबरच इतरांचाही प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन कराडचे मोटार वाहन निरीक्षक ॠषिकेश कोराणे यांनी केले.

सह्याद्रि सहकारी कारखाना कार्यस्थळावर, कारखाना व उपप्रादेशिक परिवहन विभाग कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या दरम्यान 30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. कोराणे पुढे म्हणाले की, 80 ते 85 टक्के अपघात हे चालकाच्या चुकांमुळे आणि 15 ते 20 टक्के अपघात वाहनाचा तांत्रिक बिघाड, प्रतिकुल हवामान या कारणांनी होत असतात. सरासरी 20 ते 40 या वयोगटातील दुचाकीस्वारांचे अपघात जास्तीत जास्त प्रमाणात होत असतात. हा वयोगट आपल्या कुटुंबातील कर्तव्यदक्ष घटक म्हणून कार्यरत असतो. अशावेळी अपघातग्रस्त कुटुंबांना खुप मोठ्या अडचणींना तोेंड द्यावे लागते. म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवावे, प्रवासादरम्यान वाहन चालकाने टेप रेकॉर्डर, मोबाईल आदिंचा वापर टाळावा आणि वाहनांच्या वेग मर्यादेचे भान ठेवावे व अपघात होवूच नयेत म्हणून काळजी घ्यावी. तसेच प्रत्येक वाहन चालकांनी आपलं घरी कुणीतरी वाट पाहतय या गोष्टीचा नेहमीच विचार करावा. वाहन वेगाने चालविण्यापेक्षा पहले आप असं म्हणून आपल्या वाहनाची गती मर्यादित ठेवून इतरांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे अपघात होण्याचे टाळता येईल. तसेच दुचाकीस्वारांनी नेहमीच हेल्मेटचा वापर करावा व वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.


याप्रसंगी कारखान्याकडील ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टर-ट्रेलर व बैलगाडयांना मान्यवरांच्या हस्ते रिप्लेक्टर लावण्यात आले. प्रास्ताविकामध्ये कारखान्याचे शेती अधिकारी मोहनराव पाटील यांनी सांगितले की, कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस वाहतुकीच्या सर्व वाहनांना कटाक्षाने रिप्लेक्टर लावले जातात. त्याचबरोबर यंदा ऊसाने भरलेल्या वाहनांना वैशिष्टयपूर्ण प्रकाश परावर्तीत कापडी बोर्ड लावले आहेत. तसेच वाहन चालक, मालक यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी सूचना दिल्या जातात. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस वाहनांचे अपघात रोखण्यास मदत होत आहे. ऊस विकास अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी उप ऊसविकास अधिकारी संजय चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस.साळुंखे, केनयार्ड सुपरवायझर बळवंत नलवडे, तानाजी सुर्वे, काटकर आदी उपस्थित होते.