सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही; कोयनानगरच्या विराट मेळाव्यात डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा


कोयनानगर (प्रतिनिधी) : संकलन तयार आहे, जमीन तयार आहे, लाभक्षेत्र आहे, मग वाटपास वेळ कशाला,? जमिनी वाटपाच्या ऑर्डर आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही, असा इशारा डॉ .भारत पाटणकर यांनी कोयनानगरच्या विराट मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांसमोर शासनाला दिला.

कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या दुसर्‍या टप्प्यातील आणि निर्णायक आंदोलनात ते बोलत होते. यावेळी मालोजी पाटणकर, हरिश्‍चंद्र दळवी, चैतन्य दळवी, संजय लाड, महेश शेलार, सचिन कदम, श्रीपती माने, संजय कांबळे यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी कोयना प्रकल्पग्रस्तांची विधानभवनात मिटिंग घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या 14 मागण्या मान्य केल्या होत्या. या मागण्या तीन महिन्यात पूर्ण कराव्या पण तसे न होता महसूल प्रक्रिया मुंगीच्या चालीने आणि संथगतीने काम सुरु आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांची पात्र प्रकल्पग्रस्त यादी तयार झाली आहे. हरकती, आक्षेप घेऊन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध आहे असेही सांगितले जातेय, मग घोड अडतंय कुठं? आम्हाला दुसर्‍यांदा आंदोलन करण्याची वेळ का यावी, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. आज कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाशी संबंधित संघटनांचे आंदोलने सुरु आहेत.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत उठायचे नाही, असा निर्धार सर्व ठिकाणी करण्यात आला आहे. ज्या कोयना प्रकल्पग्रस्ताना यापूर्वी अंशतः जमिनी दिल्या त्या पिकावू नाहीत. त्या ज्यांना बदलून हव्या त्यांना बदलून देऊन त्यास पाण्याची सोय करावी. अजिबात जमिनी दिल्या नाहीत त्यांना जमिनी आणि त्या जमिनीला पाण्याची सोय करुन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या मिटिंगच्या तारखेपासून निर्वाह भत्ता देण्यात यावा. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, प्रकल्पग्रस्त गावाला मोफत वीज देण्यात यावी, अशा प्रमुख मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही,असा इशाराही डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात कंबर कसली असून मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उठणारच नाही, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. वेळप्रसंगी गुरे-ढोरे ,जनावरे घेऊन आंदोलनस्थळी येणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले, संपूर्णपणे चुलबंद आंदोलन करणार असण्याचे प्रकल्पग्रस्तांकडून बोलले जात आहे.
यावेळी प्रकल्पग्रस्तांनी कोयनानगर येथे स्टँड, कॉलनी, कोयना सिंचनभवन याठिकाणी मोर्चा काढून आंदोलनस्थळी येऊन सभा घेतली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget