Breaking News

किसान सन्मान निधीसाठी पात्र शेतकर्‍यांची लगबग तलाठी, ग्रामपंचायत, कृषी कार्यालये गर्दीने फुलली


सातारा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी प्रतीवर्षी 6 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे. ही योजना तात्काळ अंमलात आणून प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी शेतकर्‍यांनी गावकामगार तलाठी, ग्रामपंचायत, कृषी कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे. दरम्यान या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळून यापासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन गतीमान झाले आहे.

पंतप्रधान किसन सन्मान योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व प्रभावीपणे व्हावी या उद्देशाने जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेमध्ये पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करणे, योजनेस व्यापक प्रसिद्ध देणे, शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती संकलित करणे ही कामे ग्राम समिती करणार आहे. तर तालुकास्तरीय समिती ग्रामस्तरावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करणार आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, माहिती संकलनाचा अढावा, क्षेत्रीय स्तरीय तक्रारींचे निवारण व सर्व विभागांचा समन्वयाची जबाबदारी जिल्हास्तरीय समिती पार पाडणार आहे. संकलीत केलेली माहिती ग्राम स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावरील हरकती व सूचनांवर ग्रामस्तरीय समिती निर्णय घेणार आहे. या निर्णयावर तालुकास्तरावर दाद मागता येणार आहे. या योजनेसाठी शेतकर्यांची संगणकीकृत यादी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही समावेश असणार आहे. एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असलेले शेतकरी कुटुंब म्हणजेच पती - पत्नी व त्यांची 18 वर्षा खालील मुले या योजनेसाठी पात्र असणार आहेत. कुटुंबाचे एकत्रित धारण क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी नावावर असलेल्या धारण क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे. अशा शेतकर्‍यांची यादी तलाठी यांच्यामार्फत तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार क्रमांक, आधार कार्ड नसल्यास लायसन्स, मतदार फोटो ओळखपत्र, नरेगा कुटुंब ओळख पत्र किंवा केंद्र व राज्य शासनाकडील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ओळखपत्र, मोबाईल क्रमांक आदी माहिती संकलीत केली जाणार आहे.

सध्या गावनिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर कुटुंब निहाय वर्गीकरण करुन खात्री करणे, सर्व संगणकीकृत माहिती संकलीत करणे, तसेच लाभार्थी शेतकरी कुटुंबांची यादी गाावांमध्ये प्रसिद्ध करुन हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर योग्य त्या दुरुस्तीसह संगणकीकृत अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी, ग्रामपंचायत, कृषी कार्यालयांमध्ये शेतकर्‍यांची वर्दळ वाढली आहे.