Breaking News

पाटण पं. स. सभेवर सत्ताधार्‍यांसह विरोधकांचाही बहिष्कार; सभागृहाचे अधिकार सरकारकडून हिरावला जात असल्याचा आरोप


पाटण (प्रतिनिधी) : स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. मात्र आज राज्याच्या ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार्‍या नव्या नेतृत्वाची पायाभरणी करणार्‍या सभागृहाचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. शासनाच्या धोरणामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा उद्देशच बाजूला पडला आहे. पंचायत राज्याची संकल्पना मोडीत काढण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे आम्ही पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगितल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधकांनी सभात्याग केला.

येथील पंचायत समितीची मासिक सभा छ. शिवाजी महाराज सभागृहात सभापती सौ. उज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, सौ. सीमा मोरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. यावेळी नूतन गटविकास अधिकारी आबासाहेब पवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे सूत्र राबविताना राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण करून समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीचे स्वप्न पाहिले होते. 73 व्या घटना दुरूस्तीने या स्वायत संस्थांना अनेक अधिकार प्रदान करण्यात आले. नाईक समिती तसेच बोंगीरवार समितीनेही याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. पंचायत समितीच्या माध्यमातून असलेल्या अधिकारावरच गदा आणली गेली आहे. 23, 24 व 25 तारखेलाही कराड येथे धरणे आंदोलन करुन जलसमर्पनही करण्याचा निर्धार केला. अशा अनेक मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. येत्या 20 तारखेला मुख्यमंत्री यांच्यासोबत याविषयी बैठक घेण्यात आली आहे. पंचायत समितीचे अधिकार काढून शासन लोकभावनेलाच तिलांजली देत आहे. त्यासाठी पूर्वीचे अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगून आजच्या सभेला आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सदस्य प्रतापराव देसाई, पंजाबराव देसाई यांनीही भावना व्यक्त केल्या. यावेळी सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार व सर्व पंचायत समितीच्या सदस्यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. सभेस पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.