Breaking News

सीबीआयच्या माजी हंगामी संचालकांना एक लाखांचा दंड; कोर्ट उठेपर्यंत शिक्षा


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक नागेश्‍वर राव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. माफी मागूनही राव यांना शिक्षा म्हणून दिवसभर न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. सोबतच राव यांना एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी नागेश्‍वर राव मंगळवारी न्यायालयात हजर झाले होते. सीबीआयकडून महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी बाजू मांडली. नागेश्‍वर राव यांनी आपल्या चुकीची माफी मागितली आहे. त्यांनी जाणून-बुजून न्यायालयाचा अवमान केला नाही, अशी बाजू वेणूगोपाल यांनी मांडली;
परंतु सरन्यायाधीशांनी त्यावर आपली नाराजी व्यक्त करत ए. के. शर्मा यांच्या बदलीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून परवानगी का मागण्यात आली नाही? असा प्रश्‍न विचारला. राव यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती होती, म्हणूनच त्यांनी कायदे विभागाची मदत मागितली होती. ही बदली करण्यापूर्वी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक होते, असेही मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे.

सीबीआयच्या संचालक पदावर असताना आपण चौकशी समितीचे माजी संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांची बदली करून ’चूक’ केली, याची कबुली राव यांनी सोमवारी न्यायालयासमोर दिली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयाची विनाअट माफीही मागितली होती. शर्मा बिहारमधील बालिका गृहात मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करत होते, त्या वेळी त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबद्दल न्यायालयाने सीबीआयला फटकारले होते.