Breaking News

बौध्दिक विकासाद्वारेच जीवनाचा महामार्ग तयार होतो- डॉ.मालपाणी


प्रवरानगर/प्रतिनिधी
यशस्वी जीवनासाठी एकांगी ज्ञानाची वृद्धी उपयोगाची नाही. तर, मन आणि बुद्धी या पैलूंच्या समन्वयातून होणार्‍या बौध्दिक विकासाद्वारे समृध्द जीवनाचा महामार्ग तयार होत असतो. असे सांगताना मुलांमध्ये उपजत असलेल्या गुणांची पारख करुन प्रत्येक मुलातील हिर्‍याला पैलू पाडत, त्याला सुयोग्य कोंदण देण्याचे भगीरथ कार्य शिक्षकांना करावे लागेल असे प्रतिपादन उद्योगपती डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

प्रवरा कन्या विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी आणि बारावीतील मुलींना देण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वेध भविष्याचा या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मालपाणी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे या होत्या.

या प्रसंगी लोणी खुर्दच्या सरपंच मनीषा आहेर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक प्रा.दिगंबर खर्डे, स्किल डेव्हलपमेंट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्या संगिता देवकर, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या जयश्री भोंडे, माजी विद्यार्थिनी गौरी राठी, माधुरी सरोदे-भोंडे, देवयानी नागरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्रुतिका वाघ, प्रज्ञा कुलकर्णी या दहावीतील आणि वैष्णवी देशमुख, दर्शन नागरे या बारावीमधील मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ. मालपाणी म्हणाले की, यश हे परमेश्‍वर आहे. आणि ते मिळविण्यासाठी मनाची एकाग्रता महत्वाची आहे. म्हणूनच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शोशल मीडियाचा अती वापर, फॅशनचा खोटा डामडौल, अनर्थक मैत्री आणि मौजमस्तीमध्ये राहण्याची संस्कृती या पाच गोष्टींना फाटा दिला तर, प्रत्येकाची शारीरिक, बौध्दिक, मानसिक आणि आत्मिक क्षमता आपोआपच वाढेल असे सांगताना डॉ. मालपाणी यांनी मुलींना योगा आणि प्राणायाम या द्वारे जीवन समृद्ध करण्याचा सल्ला देताना शिक्षक आणि पालकांनी मुलांना बोलते करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

शालिनी विखे पाटील म्हणाल्या की, प्रवरेच्या विश्‍वासाचे नाते टिकविण्याचे काम केल्यानेच आज महाराष्ट्रासह देश आणि जगाच्या कानाकोपर्‍यात गेले तरी, प्रवरेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी भेटून संवाद साधतात. त्या वेळी पद्मश्री आणि पद्मभूषण विखे पाटील यांची ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षण बाबत असलेली तळमळ सार्थकी लागल्याचे समाधान मिळते असे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन श्रद्धा काकडे आणि सिद्धी वाकचौरे या विद्यार्थीनी केले.