Breaking News

रस्त्यात अडवून मोबाईलची चोरी दोघांना अटक, एक फरार


शिरूर/प्रतिनिधी
रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगाराला रात्रीच्या वेळी रांजणगाव एमआयडीसी हद्दीत कामासाठी पायी जात असताना पल्सर मोटार सायकलवरुन तीन अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून फोन करण्याचे सांगून त्याच्याजवळील मोबाईल घेऊन पोबारा केला.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी अमर बालाजी लगड हा रात्रीच्या वेळी बेकार्ट कंपनी समोरुन कामासाठी पायी जात असताना पल्सर मोटार सायकलवरुन तीन अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात थांबवून एक फोन करायचा सांगत त्याच्याकडील वीस हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल घेऊन पसार झाले. सदर घटनेची फिर्याद रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
मोबाईल चोरीतील काही संशयित गुन्हेगारी संबंधित व्यक्तीबाबत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळताच या पथकातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षिरसागर, सहायक फौजदार गिरमकर, पो.ना.राजु मोमीन, पो.ना.पोपट गायकवाड यांनी शिरूर येथील जिजामाता उद्यान येथे सापळा रचून सोहेल शकील काझी (वय 21वर्षे), सुरज शशीकांत चव्हाण (वय 21वर्षे ) दोघे रा.शिरुर ता.शिरुर यांना मोठ्या शिताफीने सापळ्यात अडकवून ताब्यात घेतले. सदर मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासाकरीता आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.