Breaking News

सरकारी विश्वासघाताविरोधात किसान सभेचा पुन्हा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च

परळी, (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांच्या केलेल्या विश्वासघाता विरोधात पुन्हा नाशिक ते मुंबई भव्य लॉंग मार्च काढण्याचा निर्णय किसान सभेने जाहीर केला आहे. नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथील मुंबई नाका येथून लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. या लॉंग मार्च मध्ये हजारो शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान किसान सभेचे नेते कॉं उत्तम माने यांनी केले आहे. सात दिवस पायी चालून हा लॉंग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. मागील लॉंग मार्च पेक्षा या लॉंग मार्च मध्ये दुप्पट शेतकरी सामील होणार आहेत. राज्यभरातील २३ जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी होणार असल्याने ख-या अर्थाने हा राज्यव्यापी लॉंग मार्च असणार आहे. किसान सभेच्या वतीने वर्षभरापूर्वी नाशिक ते मुंबई भव्य पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. शेतकरी कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव, कसत असलेल्या जमिनींची मालकी, बुलेट ट्रेनला विरोध, पाणी, शेतकरी पेंशन यासारख्या शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या या लॉंग मार्चने राज्य सरकारकडे केलेल्या होत्या. लॉंग मार्च मध्ये ४० हजार शेतकरी पायी चालत मुंबईला पोहचल्यावर जागे झालेल्या राज्य सरकारने शेतक-यांच्या या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र लॉंग मार्चला एक वर्ष पूर्ण होत असताना अद्याप मान्य केलेल्या अनेक मागण्यांची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. शेतक-यांमध्ये यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे.